Rajanand More
उत्तर प्रदेशात कौशांबी मतदारसंघाच्या आमदार पूजा पाल यांच्यामुळे सध्या राजकीय वादळ उठले आहे. राजकीय वर्तूळात त्यांच्याच नावाची चर्चा होत आहे.
पूजा पाल यांनी नुकतेच विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. पतीची हत्या करणाऱ्या अतीक अहमदला मुख्यमंत्र्यांनी जमिनीत गाडले. त्यांनी माझे अश्रू पाहिले, असे विधान त्यांनी केले होते.
पूजा पाल या समाजवादी पक्षाच्या आमदार होत्या. पण योगींचे कौतुक करणे त्यांना भोवले. त्याचदिवशी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षातून त्यांचे निलंबन केले.
पूजा आणि राजू पाल यांचा जानेवारी 2005 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर नऊ दिवसांतच पूजा यांच्या पतीची हत्या झाली. त्यावेळी राजू हे बसपाचे प्रयागराज शहर पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते.
राजू पाल यांच्या हत्येचा आरोप माजी खासदार अतीक अहमदवर होता. त्याची पोलिसांच्या ताब्यात असताना एप्रिल 2023 मध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
पतीच्या हत्येनंतर पूजा या 2007 मध्ये बसपाच्या तिकीटावर आमदार बनल्या होत्या. 2012 मध्ये पुन्हा निवडून आल्या. 2017 मध्ये पराभवानंतर 2022 मध्ये समाजवादी पक्षाने त्यांना कौशाम्बी मतदारसंघातून निवडून आणले.
अतीक अहमदच्या हत्येनंतर पूजा पाल यांचा भाजपकडे आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी जवळीक वाढल्याची चर्चा होती.
फेब्रुवारी 2024 च्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान पूजा पाल यांच्यासह सपाच्या चार आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले होते. तिघांना काही दिवसांपूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. आता पूजा पाल यांचेही निलंबन झाले.