Deepak Kulkarni
शैक्षणिक,आरोग्य, आर्थिक स्वावलंबनबाबत जागरुकतेसह तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहे.
कोल्हापूरनं क्रांतीकारी पाऊल टाकताना नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून तृतीयपंथीयांना प्रशिक्षण देण्यात आले असून एकूण 10 जणांची टीम तयार केली आहे.
प्रशिक्षणानंतर आता तृतीय पंथीयांची टीम आता महापूर, भूकंप यांसह कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमध्ये बचाव कार्यासाठी पुढे असणार आहे.
कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी तृतीय पंथीयांचे हे जगातील पहिलेच बचाव पथक असल्याचा दावा केला आहे.
कोल्हापुरातील राजाराम तलाव येथे तृतीयपंथीयांच्या टीमला बुडणाऱ्या माणसाला कसं वाचवावं, मोटर हाताळणं, पाण्यातून बाहेर कसं काढावं, व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठीचे उपचार, बोटनिर्मिती, ती पुन्हा डिफ्लेक्ट करण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलं.
यावेळी मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर आणि सुहासिनी देवमाने यांनी तृतीयपंथीय हे कोणत्याही क्षेत्रात त्यांचं शिक्षण, गुणवत्ता, सातत्य, जिद्द आणि मेहनतीनं यश मिळवू शकतात हे सिद्ध होत असल्याचं म्हटलं.
आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांतून आता कोल्हापूर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही कोणत्याही संकटांचा मुकाबला करण्यासाठी ही तृतीय पंथीयांची दहा जणांची रेस्क्यू टीम सज्ज असणार आहे.
कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या खांद्याला खांदा लावून बचाव कार्यासाठी हे तृतीयपंथीयांचं पथक असणार आहे.
कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनानं तृतीयपंथीयांनी स्वाभिमानी जीवन जगण्यासह इतरांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल कौतुकाचा विषय ठरत आहे.