Rajanand More
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून कामांचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी बुधवारी (ता. १९) आमदारांसाठीही एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व आमदारांना नवीन सरकारी कार देण्याची घोषणा विजय यांनी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे वाहनांची देखभाल, इंधन आणि चालकाच्या खर्चासाठी दरमहा ७५ हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे.
विजय यांच्या या निर्णयाचे टीव्हीके पक्षाप्रमाणेच इतर पक्षांच्या आमदारांनीही जोरदार स्वागत केले. टीव्हीकेच्या एका महिला आमदाराने तर चक्क त्यांच्यासाठी गाणं गायलं.
कार देण्याच्या निर्णयाने आनंदित झालेल्या आमदार के. सिंधू यांनी तमिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या ‘पडगोट्टी’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘कोडुत्तदेलाम कोडुत्तान’ हे गाणं गात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
“त्याने सर्व काही दिले, पण ते कुणा एकासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी दिले,” असा त्या गाण्याचा अर्थ होता. हे मुळ गाणे प्रसिद्ध गायक टी. एम. साउंडरराजन यांनी गायले होते.
सिंधू यांनी गाणं गाण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांच्या पक्षातील अन्य आमदारांनी बाकं वाजवून त्यांना दाद दिली. विजय यांनीही स्मितहास्य करत सिंधू यांनी अनोख्या पध्दतीने मानलेल्या आभाराचा स्वीकार केला.
के. सिंधू यांनी पहिल्यांदाच आमदार बनल्या आहेत. विजय यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत त्या गुडियात्तम या मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी मातब्बर नेत्यांचा पराभव केला आहे.
उच्चशिक्षित असलेल्या सिंधू यांना संगीत आणि नृत्याची आवड असून त्या अॅकॅडमी चालवितात. त्यांचे विजय यांच्यासाठीचे गाणे काही तासांतच सोशल मीडियात हिट ठरले असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.