Rajanand More
सर्वसामान्य भारतीयांनाही विमान प्रवास करणे शक्य व्हावे यासाठी मोदी सरकारने २०१६ मध्ये प्रादेशिक हवाई संपर्क योजना – उडान (UDAN) ही योजना सुरू केली होती. लहान शहरांना आणि दुर्गम भागांना हवाई सेवेशी जोडणे हा उद्देश.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हवाई चप्पल घालणारा माणूसही हवाई प्रवास करू शकेल’ असा आशावाद व्यक्त केला होता.
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित उडान 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तरी हवाई चप्पल वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास परवडणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
उडान 2.0 अंतर्गत सरकारचे तब्बल 28 हजार 840 कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य आहे. ही योजना पुढील 10 वर्षे राबविली जाणार आहे.
नव्या योजनेत देशभरात 100 नवीन विमानतळ आणि 200 आधुनिक हेलीपॅड उभारण्याचे नियोजन आहे. तसेच विमान कंपन्यांना 5 वर्षांपर्यंत अनुदान दिले जाईल. अन्य काहीही सुविधाही आहेत.
योजनेमुळे टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये हवाई क्रांती घडेल, असे मोदी सरकारचे म्हणणे आहे. मात्र, आधीच्या योजनेला अपेक्षित यश न मिळाल्याने नवी योजना यशस्वी ठरेल का, असा प्रश्न आहे.
मागील योजनेत हवाई भाडे प्रति तास अडीच हजार रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा उद्देश होता. मागील योजनेत 2017 पासून आतापर्यंत 663 मार्ग सुरू करण्यात आले आहे.
नव्या योजनेत पुढील दहा वर्षांत तब्बल ४ कोटी अतिरिक्त प्रवासी हवाई सफर करतील, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. त्यातून पर्यटन व व्यापार वाढून संतुलित विकासाला चालणार मिळेल, असे सरकारला वाटते.