Jagdish Patil
ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरेंसह सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतील एका फोटोमुळे सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीधील घटक पक्षांची बैठक पार पडली त्या बैठकीतील हा फोटो आहे.
या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, आदित्य ठाकरे हे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे. यावरूनच शिंदेंची शिवसेना, भाजपने ठाकरेंना डिवचलं आहे.
हिंदुत्व, विचारधारा सोडली की पदरात काय पडलं तर शेवटची रांग? असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी यांनी लगावला आहे.
खासदार नरेश म्हस्केंनी, बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का? काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवली, अशी टीका केली.
दरम्यान, या बैठकीचे फोटो राहुल गांधींनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे पहिल्या रांगेत बसल्याचं दिसत आहे.
तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत तर तेजस्वी यादव तिसऱ्या रांगेत आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवारही तिसऱ्या रांगेत बसलेत. तर ही बैठक नव्हती प्रेझेंटेशन असल्यामुळे तिथं कोणताही प्रोटोकॉल नव्हता, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं.