Sachin Fulpagare
लोकसभा तर आहेच. मात्र विधानसभा निवडणुकीत सुद्धा आमच्या अधिक जागा आम्ही महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जे जे म्हटले असेल ते त्यांनी करून दाखवावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले आहे.
मातोश्रीला दोन-चार खोके देऊन चालत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला प्रचंड दिले. आता आम्ही आमदारकी मागणार नाही, खासदारकी मागणार नाही. फक्त आमच्या भगव्या झेंड्याचे तेज वाढले पाहिजे. पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, असा दावा कदम यांनी केला.
कोल्हापुरात शिवसेनेचे (शिंदे गट ) महाअधिवेशन सुरू आहे. त्यासाठी रामदास कदम कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा, याला त्याला ईडी लावण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे. आतापर्यंत दिलेले सर्व खोके कुठे गेले? ते सर्व बाहेर आले पाहिजे. भ्रष्टाचारी कोण आहे ते महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे, असे कदम म्हणाले.
महाराष्ट्रात बाप-बेटे असे दोघेजण. उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिल्लू या दोघांचे बोलणे आपण ऐकले, त्यांचे टोमणे आपण ऐकले तर विझताना जसा दिवा फडफडतो, तसे ते फडफडताना दिसत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
आमच्या 40 आमदारांपैकी एकाने जरी 50 खोके घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. हे बापबेटे फक्त चाळीस आमदारांना बदनाम करण्याचे काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
आपल्यातून 40 आमदार का निघून जातात याचे आत्मचिंतन केले पाहिजे. माझी आमदारकी काढली, माझे मंत्रिपद काढले. मी मिठाई देण्यात कमी पडलो. नाहीतर मंत्री असतो. रवींद्र वायकर का मंत्री झाले? हे वायकरांनी सांगावे? असे सूचक विधानही रामदास कदम यांनी केले.