Rashmi Mane
ब्रिटनच्या माजी गृहमंत्री आणि खासदार प्रीति पटेल यांनी नवरात्री साजरी करत शुभेच्छा दिल्या.
मात्र त्यांच्या या पोस्टवरून ब्रिटनमध्ये वादंग उभा राहिला असून त्यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
प्रीति पटेल या कंझर्वेटिव्ह पक्षाच्या खासदार असून त्या काही काळ ब्रिटनच्या गृहमंत्रीही राहिल्या आहेत.
नवरात्रीच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक्स (माजी ट्विटर)वर लिहिले, “आज नवरात्रीची सुरुवात आहे, हा एक पवित्र हिंदू सण आहे. देवी दुर्गा व चांगुलपणाचा वाईटावर विजय याचे हे प्रतीक आहे. या नवरात्री सर्वांना शांती, समृद्धी आणि आशीर्वाद लाभो.”
या पोस्टसोबत त्यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. त्या एका हिंदू मंदिरासमोर गुलाबी रंगाच्या अनारकली सूटमध्ये उभ्या आहेत. त्यांच्या कपाळावर लाल बिंदी आहे आणि हातात कलावा बांधलेला आहे.
मात्र यावरून ब्रिटनमधील अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल केले. काहींनी लिहिले – “जर भारतीय सण आवडत असतील तर भारतात जा.”
प्रीति पटेल यांचे मूळ गुजरातशी जोडलेले आहे. त्यांचे आईवडील आधी युगांडामध्ये स्थायिक झाले होते आणि नंतर 1960 च्या दशकात ब्रिटनमध्ये आले.
लंडनमध्ये जन्मलेल्या प्रीति यांनी तरुण वयातच राजकारणात प्रवेश केला. 2019 साली त्या ब्रिटनच्या गृहमंत्री झाल्या होत्या.