Rajanand More
उत्तर प्रदेशातील आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांचा अर्ज योगी सरकारने नुकताच मंजूर केला.
गुप्ता यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राजकारण तापू लागले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीच उडी घेतली आहे.
अखिलेश यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी विपरीत स्थितीमुळे स्वेच्छानिवृत्ती घेत असून हे चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले. त्यांच्या विभागात, सोशल मीडियात त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना अपमानित करण्यात आले. हे निंदनीय असल्याचे टीकास्त्र अखिलेश यांनी सोडले आहे.
गुप्ता हे 1989 च्या तुकडीचे अधिकारी होते. त्यांचा राजीनामा मंजूर झाला त्यावेळी ते महासंचालक (रूल्स अन्ड रेग्युलेशन्स) होते.
समाजवादी पक्षाची सत्ता असताना गुप्ता हे एसटीएफ आणि रेल्वेचेही आयजी होते. 2014 मध्ये एडीजी बनल्यानंतर ते केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर गेले. 2022 मध्ये ते पुन्हा उत्तर प्रदेशात परतले होते.
केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून आल्यानंतर त्यांना सहा महिने पद दिले गेले नव्हते. अखेर जून 2023 मध्ये महासंचालक (रूल्स अन्ड रेग्युलेशन्स) या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.
गुप्ता यांनी दोन महिन्यांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता. हा अर्ज योगी सरकारने मंजूर केला आहे. याच महिन्यात ते निवृत्त होतील.