Rashmi Mane
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आता आपल्या परीक्षांमध्ये हेराफेरी आणि बनावट उमेदवार ओळखण्यासाठी ‘एआय’वर आधारित चेहरा पडताळणी तंत्रज्ञान वापरण्याची योजना सुरू केली आहे.
यासाठीच्या पायलट प्रोग्रामची यशस्वी चाचणी नुकतीच घेतली गेली असून भविष्यात या प्रणालीचा परीक्षांमध्ये वापर सुरू होणार आहे, असे यूपीएससी अध्यक्ष अजयकुमार यांनी सांगितले.
उच्च प्रशासनिक सेवा, परराष्ट्र सेवा, पोलिस सेवा आणि इतर नागरी सेवा भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात.
या परीक्षांमध्ये उमेदवारांच्या ओळखीची खात्री करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल.
नॅशनल ई-गव्हर्नन्सशी भागीदारी करून चेहरा पडताळणीसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. ही प्रणाली फक्त परीक्षेच्या दिवशी उमेदवारांच्या फोटोची पडताळणी करणार नाही, तर भविष्यात परीक्षेतील हेराफेरी टाळण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
यूपिएससीच्या या नवीन प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत सुरक्षितता वाढेल आणि बनावट उमेदवार परीक्षेत प्रवेश करू शकणार नाहीत, असा विश्वास आहे.
तसेच, या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे.