Rajanand More
अमेरिकेत मध्यावधी निवडणूक शनिवारी (ता. ४) पार पडली. या निवडणुकीत सुमारे १० कोटी मतदारांनी सहभाग घेतला. त्यानंतर काही तासांतच निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे.
अमेरिकेत मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जात नाही. मतपत्रिकेवरच मतदान होते. पण त्यानंतरही अत्यंत कमी कालावधीत मतमोजणीही पार पाडली जाते.
भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांकडून ईव्हीएमचे बटन दाबून मतदान केले जाते. या मशीनमध्ये संबंधित उमेदवारासाठी पडलेली मते एकत्रित होतात. केवळ एक बटन दाबताच उमेदवाराला मशीनमध्ये मिळालेली मते स्क्रीनवर झळकतात.
भारतामध्ये लोकसभा व विधानसभेची निवडणूक वगळता अन्य निवडणुका मतपत्रिकांवर होतात. या मतांची मोजणी मतमोजणी केंद्रांवर नियुक्त कर्मचाऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे त्याला प्रचंड कालावधी लागतो.
अमेरिकेत मतपत्रिकेवरील मतांची मोजणी मशिनद्वारे केली जाते. प्रत्येक मतपत्रिकेचे स्कॅनिंग होते. मतदानानंतर मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर लगेचच ही प्रक्रिया सुरू होते.
मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिकांचे जतन केले जाते. भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची फेरमोजणी किंवा ऑडिट करण्यासाठी कायद्यात ही तरतूद आहे.
अमेरिकेतील मतमोजणी लवकर संपण्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे. मतदानाच्या दिवसाच्या आधीपासूनच टपालाद्वारे किंवा मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करता येऊ शकते.
अमेरिकेत यावेळी २ नोव्हेंबरपर्यंतच तब्बल ५ कोटी ७० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मतमोजणीचे काम मतदानाच्या मुख्य दिवसाच्या आधीपासूनच सुरू होते. पण अधिकृत निकाल जाहीर होत नाही.