Rajanand More
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. या पराभवानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.
भाषणादरम्यान भावूक झालेल्या कमला हॅरिस म्हणाल्या, हा निकाल म्हणजे शेवट नाही. नाउमेद न होता आपल्या तत्वांसाठी लढत राहा, असे आवाहन त्यांनी समर्थनकांना केले.
माझ्या पराभामुळे तुमचा अपेक्षाभंग झाला. तुम्ही दाखवलेला विश्वास आणि देशावरील तुमचे प्रेम पाहून मन भरून आले. पराभवानंतरही तुमच्या चेहऱ्यावर निर्धार दिसत असल्याचे हॅरिस समर्थनकांना उद्देशून म्हणाल्या.
आपल्याला हवे तसेच निकाल या निवडणुकीत लागले नाहीत. आपण ज्यासाठी लढा दिला, ज्यासाठी मतदान केले, तसेच निकाल आले नाहीत, असे हॅरिस म्हणाल्या.
आपण सर्वजण भावनिक झालो असलो तरी जनमताचा आदर करून निकालाचा स्वीकार करायला हवा. आपली बांधलकी राज्यघटनेशी आहे, राष्ट्राध्यक्ष किंवा पक्षाशी नव्हे, असेही हॅरिस यांनी म्हणाल्या.
डोनाल्ड ट्रम्प यांना आपण फोन करून त्यांचे अभिनंदन केल्याची माहितीही हॅरिस यांनी भाषणादरम्यान दिली. सत्तेचे हस्तांतर शांततेत होईल, अशी त्यांना खात्री दिल्याचे कमला हॅरिस यांनी सांगितले.
महिलांचे स्वातंत्र्य, शाळा आणि रस्त्यांवरील गोळीबाराच्या घटना थांबविणे, लोकशाही आणि कायद्याचे राज्य तसेच समान न्याय, मुलभूत अधिकारांठी आपण लढात देत राहू, असा विश्वास हॅरिस यांनी व्यक्त केला.
आपण जोपर्यंत लढत राहू, तोपर्यंत अमेरिकेच्या उज्ज्वल भविष्याचे वचन असेच तेवत राहील, असा निर्धार कमला हॅरिस यांनी व्यक्त केला.
कधीकधी लढा पूर्ण व्हायला वेळ लागतो. त्यामुळे निराश होऊ नका. प्रयत्न करणे सोडू नका. हार न मानता बाह्या सरसावून कामाला लागा, असे आवाहन कमला हॅरिस यांनी तरुणाईला केले.
कमला हॅरिस यांनी भाषणादरम्यान कुटुंबाचेही आभार मानले. माझ्या कुटुंबाचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्यावर माझे खूप प्रेम आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि संपूर्ण टीम आणि समर्थकांचेही आभार मानते, असे हॅरिस म्हणाल्या.
कमला हॅरिस यांनी आपले भाषण केवळ 15 मिनिटांत संपवले. विजयानंतर ज्याठिकाणी जल्लोष करण्याचे नियोजन होते, तिथेच त्यांनी पराभवाचे भाषण केले.