Deepak Kulkarni
दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी यूपीएससीची परीक्षेची तयारी करत असतात.पण त्यातले मोजकेच काही जण हुशारी,सातत्य आणि कठोर मेहनत यांच्या जोरावर उत्तीर्ण होत यशस्वी होतात.
यूपीएससी उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवेत आयपीएस आणि आयएएस यांसह विविध महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळते.
पण उत्तर प्रदेश कॅडरमधून अवघ्या 24 व्या वर्षी आयपीएस झालेल्या एका अधिकाऱ्याची कारकीर्द आता पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे.
महोबात एसपी पदावर मणिलाल पाटीदार हे कार्यरत असतानाच क्रशर व्यावसायिक इंद्रकांत त्रिपाठी यांच्यावर 8 सप्टेंबर 2020 रोजी गोळीबार करण्यात आला होता. यानंतर कानपूर येथे उपचारादरम्यान 13 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.
यानंतर मयत इंद्रकांत यांचे भाऊ रविकांत यांनी तत्कालीन एसपी मणिलाल पाटीदार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. हत्येआधी इंद्रकांत त्रिपाठींनी 2020 मध्ये सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत मणिलाल पाटीदार यांच्यावर 6 लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला होता.
त्रिपाठी हत्याप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आल्यानंतर पाटीदार फरार झाले होते. सरकारने त्यांच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.
अखेर मणिलाल याने 2022 मध्ये उत्तर पोलिसांसमोर शरण आला होता. यानंतर त्याला पोलिस सेवेतून जून 2023 मध्ये कायमचे बडतर्फ करण्यात आले.
मणिलाल पाटीदार यांनी हत्या आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे नोकरी गमावल्यानंतर आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या आर्थिक माया जमवल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या नवीन एफआयआरमुळे मणिलाल पाटीदार चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या सर्व संपत्तीवर कारवाईची टाच येण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी तफावत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.