Rajanand More
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हर्षिल भागातील खीर गंगा नदीजवळ मंगळवारी भीषण ढगफुटी झाली. त्यामुळे प्रचंड पाण्याच्या प्रवाहासोबत आलेल्या दगड-मातीच्या लोंढ्याने मोठे नुकसान झाले आहे.
धराली या गावावर हे संकट ओढवले असून निम्म्याहून अधिक गाव उद्ध्वस्त झाले आहे. ढिगाऱ्या अनेक घरे, हॉटेल, दुकाने गाडली गेली आहे. त्याचे अंगावर काटे आणणारे फोटो समोर आले आहेत.
दुर्घटनेमध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धरालीमधून वाहत असलेल्या खीर गंगा नदीलगतच्या डोंगरावर मंगळवारी दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. परिणामी नदीला अचानक महापूर आला. त्यासोबत दगड-मातीही मोठ्या प्रमाणात वाहून आली.
पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा केवळ ३० सेकंदाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. डोंगरातून प्रचंड वेगाने वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे घरे, हॉटेल पत्त्यासारखी कोसळत असल्याचे दिसते.
20 फुटाचा ढीग
केवळ 30 सेकंदातच वर्दळीचा भाग मातीखाली दबला गेला. या दुर्घटनेमुळे या भागात तब्बल 20 फूट उंचीचा ढिगारा तयार झाला.
धराली हे गाव गंगोत्री धामपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे. अनेकजण गंगोलीला जाताना धराली गावात आश्रय घेतात. त्यामुळे या गावात अनेक हॉटेल गेस्टहाऊस, ढाबे आहेत.
गावामध्ये पर्यटकांची गर्दी असते. हॉटेल, गेस्टहाऊस गजबजलेली असतात. या घटनेमुळे मोठा हादरा बसला आहे. आणखी पर्यटक दबले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या बचावासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. एनडीआरएफसह लष्कर आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जात आहे.