Deepak Kulkarni
शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर भूमिका मांडून सरकारला अडचणीत आणणारे खासदार वरुण गांधी यांना भाजपनं धक्का दिला आहे.
पिलिभीत मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
ते मागील 15 वर्षांपासून पिलीभीतचं नेतृत्व करत असून त्याआधी त्यांच्या मातोश्री मनेका गांधी इथून खासदार होत्या.
वरुण गांधी व त्यांच्या मातोश्री मनेका गांधी या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. मनेका गांधी यांनी भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदही भूषवलं आहे.
तिकीट कापण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपासून दूर असलेले वरुण गांधी अखेर प्रचारात सक्रीय झाले आहेत.
आपल्या मातोश्री मनेका गांधी यांच्या प्रचारसभेत बोलताना वरुण गांधींनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पण त्यांनी भाषणावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा अजिबात उल्लेख केला नाही.
ते सभेला आले तेव्हा त्यांनी भाजपाचा गमछा घालणे टाळले. त्यांनी गळ्याभोवती गुंडाळलेल्या गमछावर 'राधे राधे' असे शब्द लिहिले होते.
पिलीभीतमध्ये प्रत्येकाकडे ज्याप्रमाणे वरुण गांधींचा नंबर आहे, त्याचप्रमाणे सुलतानपूरमध्ये माझी आई रात्री-बेरात्री फोन उचलते आणि सर्वांना मदत करते. म्हणून मनेका गांधी यांनाच मोठ्या संख्येने मतदान करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भाजपने त्यांच्या जागी पिलिभीतमधून काँग्रेसमधून आलेल्या जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबतचा रोष वरुण यांच्या भाषणातून स्पष्ट दिसून आला.