Rajanand More
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आहे.
राधाकृष्णन यांना 452 तर रेड्डींना 300 मते मिळाली आहेत. त्यानुसार रेड्डींचा 152 मतांनी पराभव झाला आहे. एनडीएला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाली.
निवडणुकीत इंडिया आघाडीची काही मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीने यापूर्वी आपली 315 मते असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सुदर्शन यांना 300 मते मिळाली.
एकूण 767 पैकी 15 मते अवैध ठरली. त्यामध्ये एनडीएची 10 आणि आघाडीची 5 मते असल्याची चर्चा आहे. त्यानुसार इंडिया आघाडीची दहा मते फुटल्याची सांगितले जात आहे.
एनडीएतील खासदारांची संख्या 427 होती. मात्र त्यांना 27 अधिक मते मिळाली. त्यामध्ये वायएसआर काँग्रेसच्या 11 मतांचा समावेश आहे. त्यानुसार एकूण आकडा 438 होतो. अधिकची 14 मते कुठून मिळाली, याचीच चर्चा सुरू आहे.
राधाकृष्णन यांना आघाडीची जवळपास दहा मते मिळाली असण्याची शक्यता आहे. उर्वरित चार मते ही अपक्ष किंवा मतदान न करण्याचा निर्णय घेतलेल्या काही पक्षांची असू शकतात, असा अंदाज आहे.
निवडणुकीत एनडीएलाही धक्का बसल्याची शक्यता आहे. एनडीएचीच सर्वाधिक दहा मते अवैध ठरल्याचे सांगितले जात आहे. अन्यथा राधाकृष्णन यांचे मताधिक्य वाढले असते.
महाराष्ट्रातील एनडीएच्या नेत्यांनी महाविकास आघाडीची मते फुटल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांची प्रत्येकी 2 ते 3 मते फुटल्याचा दावा.