सरकारनामा ब्यूरो
डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघाचे आमदार असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत. याच मतदारसंघातून ते यावेळी निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या मालमत्ता विवरणपत्रानुसार त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या अनेक ठिकाणी जमिनी,मुंबईत फोर्ट तसेच वरळीत आलिशान फ्लॅट आहेत. या फ्लॅटच्या किंमती तीस कोटीपेक्षा जास्त आहेत.
गावित यांच्याकडे ७.२५ लाख तर पत्नीकडे ६.९६ लाख रुपयांची रोकड आहे. तसेच गावितांच्या विविध बँक खात्यात ६४.५१ लाख आणि पत्नीच्या १३ लाख खात्यात रक्कम जमा आहेत.
गावित यांच्या विविध बँकांमध्ये ५६.४७ लाख रुपयांच्या ठेवी आणि २.५५ लाखांची बंधपत्रे आहेत.
गावित यांच्या कुटुंबीयांकडे ३३ लाखांची चार वाहने आहेत. तर ४३७ ग्रॅम सोने, एक किलो चांदी असे ७५ लाखांचे दागिने आहेत. त्याची एकूण किंमत ४.६२ कोटी रुपये इतकी आहे.
१५ गावांत पती-पत्नीच्या जमिनी आहेत. त्यामध्ये देवपूर, चौपाळे, धुली, पथराई अशा गावांत गावितांच्या नावे, तर पत्नीच्या नावावर वाघोडा, चौपाळे, पतोंडा, प्रकाश वाडा, पथराई, नवापूर, नंदुरबार, नील, जांबोली तसेच इतर गावांमध्ये शेत जमीन आहे.
गावीत यांच्या पत्नीकडे मुंबईत फोर्ट येथे तसेच वरळी येथे शुभदा सोसायटीमध्ये दोन फ्लॅट आहेत. तसेच देवपूर, नंदुरबार, नटावद या ठिकाणी त्यांची घरे आहेत.
सर्व घरे आणि जमिनी मिळून एकूण किंमत ३०.२१ कोटी रुपये आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तांचे किंमत सुमारे १३.५६ कोटी इतके आहे.