Jagdish Patil
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यामुळे देशभरात विनेश फोगाटबद्दल भावनिक लाट पसरली होती.
तेव्हाच तिने पुन्हा कुस्ती खेळणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता विनेश राजकीय मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाटसह बजरंग पुनिया या दोघांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी विनेश आणि बजरंग यांचे पक्षात स्वागत केलं.
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच तिने भाजपवर टीका केली, "आम्हाला जेव्हा रस्त्यावर फरफटत नेलं जात होतं तेव्हा भाजप सोडून सगळे पक्ष आमच्या बाजूने उभे होते. आमच्या अश्रूंना हे पक्ष समजून घेत आहेत." असं ती म्हणाली.
महिलांविरोधात होत असलेल्या अन्यायाविरोधात उभ्या असलेल्या पक्षाशी मी जोडल्याचा मला अभिमान आहे, असं म्हणत तिने काँग्रेसचं कौतुक केलं.
यावेळी के. सी. वेणुगोपाल यांनी विनेश आणि बजरंग पुनिया राहुल गांधींची भेट घेतले म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचं सांगितलं.
विनेश आणि बजरंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या पदांचा राजीनामा दिला. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती, यावरूनच काँग्रेसने रेल्वेवर निशाणा साधला.