Rashmi Mane
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून सरकारला विविध मागण्यांसाठी विरोधीपक्षांनी घेरले आहे.
सभागृहात साधारण आठ तासांचं कामकाज चालतं. पण अध्यक्ष सतत त्या खुर्चीवर बसू शकत नाहीत. अशावेळी अध्यक्षांच्या जागी कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे तालिका अध्यक्ष.
अध्यक्ष अनुपस्थित असताना बैठकीचं संचालन चालूच ठेवण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक अधिवेशनासाठी एक विशेष पॅनल तयार केला जातो. या पॅनलवरील सदस्यांना तालिका पिठासीन अधिकारी म्हणतात.
या पॅनलमध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व दिलं जातं. ज्यांच्या सदस्यसंख्या जास्त, त्या पक्षाचे पिठासीन अधिकारीही तितकेच जास्त असतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे अधिकारी अधिक असतात.
विधानसभा आणि लोकसभेत तालिका अध्यक्ष तर विधान परिषद आणि राज्यसभेत तालिका सभापती असतात. यांना कार्याध्यक्ष म्हणूनही ओळखलं जातं.
अध्यक्ष अनुपस्थित असताना सभागृहातलं काम सुरळीत, नियमशिस्तीत आणि प्रोटोकॉलनुसार चालत आहे की नाही, याची काळजी घेणं हे तालिका अध्यक्षांचं प्राथमिक कर्तव्य असतं.
तालिका अध्यक्षांना वेगळे किंवा अतिरिक्त अधिकार नसतात. ते फक्त कामकाज निर्विघ्न सुरू राहावं यासाठी अध्यक्षांच्या खुर्चीवर बसतात. निर्णयक्षमता, स्थगन, प्रस्ताव मंजुरीचे अधिकार मात्र अध्यक्षांकडेच राहतात.