सरकारनामा ब्यूरो
नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे दिवसभरात 16-18 तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात. या धावपळीतही ते फिटनेससाठी काय करतात? काय आहे त्यांचा फिटनेस फंडा जाणून घेऊयात.
‘शरीर फिट तर, मन फिट, मन फिट तर करिअर फिट’ हे बाळकडू मुरलीधर मोहोळ यांना त्यांचे वडील किसनराव यांनी दिले होते.
मोहोळ सांगतात की, ते मुळचे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील असल्याने तिथे घरोघरी कुस्तीचे वेड आहे. वडील आणि आजोबा पहिलवान असल्याने त्यांनाही कुस्तीचे वेड लागले.
वयाच्या 13 व्या वर्षी वडिलांनी त्यांना सदाशिव पेठेतील खालकर तालमीत पाठवले. शाळा आणि दुसरीकडे तालीम, असा त्यांचा दिनक्रम सुरू होता.
कुस्तीची कारकीर्द घडत असताना त्यांच्या पायाची नस दाबली गेली. त्यामुळे कुस्ती सोडली आणि सार्वजनिक जीवनात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरवात केली. मात्र त्यांची व्यायामाची सवय सुटली नाही.
काॅलेजमध्ये असताना ते रोज 7-10 किलोमीटर धावण्याचा व्यायाम आणि नंतर पारंपरिक व्यायाम असायचा. यात त्यांना रोज 500 ते 1000 जोर, बैठका 1500 ते 2000, सपाट्या 300 ते 500 आदी व्यायाम प्रकारांचा समावेश असायचा.
निवडणुकांच्या राजकारणात सक्रिय झाल्याने धावपळ वाढली. ताणतणाव वाढल्यांने मोहोळ यांनी सूर्यनमस्कार, योगासनांचा आधार घेत घरातच अधूनमधून जोर-बैठकांचा व्यायामही सुरु केला.
कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू दिले नाही आणि निरोगी आहारावर लक्ष केंद्रित केले. आता खासदार म्हणून दिल्लीत मिळालेल्या बंगल्यात त्यांनी व्यायामाचे साहित्य जमविण्यास सुरवात केली आहे.