Jagdish Patil
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत बेचिराख झाले.
या दुर्घटनेवर नाट्यप्रेमी आणि तमाम करवीरवासीयांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर अनेकांना आपले अश्रू अनावर झाले आहेत.
कोल्हापुरकरांसाठी ऐतिहासिक वारसा असलेल्या या नाट्यगृहाचा इतिहास नेमका कसा आहे ते जाणून घेऊया.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज 1902 साली युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी तेथील नाटकांच्या सादरीकरणाची मोठमोठी नाट्यगृहे बघितल्यानंतर कोल्हापूरातही असे नाट्यगृह बांधण्याची कल्पना त्यांना सुचली.
रोमवरून येताच भव्यदिव्य असे नाट्यगृह उभारणीला सुरुवात केली. तारीख होती 9 ऑक्टोबर 1913 पुढील दोन वर्षांत ते नाट्यगृह उभे राहिले.
या नाट्यगृहाला नाव दिले पॅलेस थिएटर. शाहू महाराजांचे सुपुत्र युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते 14 ऑक्टोबर 1915 रोजी नाट्यगृहाचे उद्घाटन झाले.
1957 मध्ये या नाट्यगृहाचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण करण्यात केले.
1979 पर्यंत हे नाट्यगृह शासनाच्या ताब्यात होते. त्यानंतर ते महापालिकेकडे आले. 1980 ते 84 व 2003 ते 2005 या काळात त्याचे नूतनीकरण करण्यात आले.