Ganesh Sonawane
सायबर भामट्यांकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्वांत आधी १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करा.
यानंतर त्वरित बँकेशी संपर्क साधून तुमचे बँक खाते आणि युपीआय सेवा ब्लॉक करा.
फसवणुकीच्या पहिल्या काही तासांत पावले उचलल्यास गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते.
सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांच्या रकमेची सुलभ रिकव्हरी आणि गोठविलेली बॅंक खाती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सायबर गुन्हे समन्वय केंद्राने 'ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम' (जीआरएम) आणि 'मनी रिस्टोरेशन मॉड्यूल' (एमआरएम) ही दोन पोर्टल्स सुरू केली आहेत.
ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम' ही एक डिजिटल प्रणाली आहे. या अंतर्गत नागरिकांना विविध सरकारी सेवा किंवा विभागांशी संबंधित समस्या ऑनलाइन नोंदवता येतात. या प्रणालीमुळे पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढून तक्रारींचा वेळेत निपटारा केला जातो.
हे सब-पोर्टल राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलचा (NCRP) एक भाग आहे. सायबर फसवणुकीनंतर जर फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील रक्कम पोलिसांनी गोठवली असेल, तरच तुम्ही NCRP पोर्टलद्वारे परताव्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे १४ अंकी तक्रार नोंदणी क्रमांक असणे अनिवार्य आहे.
वरील दोन्ही पोर्टलमुळे न्यायालय, बँकांच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका होऊन न्याय मिळू शकेल, असा विश्वास पोलिसांना आहे.