Rashmi Mane
भारतीय संविधानाची निर्मिती ही भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. देशाला न्याय, समानता आणि स्वातंत्र्य देणारा हा दस्तऐवज तयार करण्याचे कार्य अत्यंत बारकाईने करण्यात आले.
संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रक्रियेचे नेतृत्व केले. त्यांच्या बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिश्रमामुळे संविधान आजही जागतिक आदर्श मानले जाते.
संविधान टाइप करण्यासाठी वापरलेला ऐतिहासिक टाइपरायटर आजही अस्तित्वात आहे. बाबासाहेबांच्या या कार्याचा तो सर्वात जिवंत पुरावा मानला जातो.
हा टाइपरायटर नागपूरजवळ चिचोलीतील शांतिवन येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात जपून ठेवण्यात आला आहे. शांतिवन हे बाबासाहेबांच्या आठवणी जपणारे पवित्र ठिकाण आहे.
संग्रहालयात बाबासाहेबांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथ ‘द बुद्धा अँड हिज धम्मा’ टाइप करण्यासाठी वापरलेला आणखी एक टाइपरायटरही ठेवलेला आहे. त्यामुळे येथे ठेवलेल्या दोन्ही यंत्रांचे ऐतिहासिक मूल्य अत्यंत मोठे आहे.
1991 साली बाबासाहेबांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांचे साहित्य, वस्तू आणि स्मरणचिन्हे बौद्ध परिषदेचे सचिव वामनराव गोडबोले यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर शांतिवन उभारून ही अमूल्य वस्तू तिथे जतन करण्यात आल्या.
टाइपरायटरसोबतच त्यांच्या वापरातील कोट, खुर्ची, टोपी, टाय, पेन, कप यांसारख्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन आहे. त्यातून त्यांच्या साधेपणाची आणि मेहनतीची जाणीव होते.
शांतिवन हे आज इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि बाबासाहेबांच्या कार्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे प्रेरणास्थान बनले आहे.
शांतिवनात भेट दिल्यावर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची, त्यागाची आणि संविधाननिर्मितीच्या महान प्रक्रियेची अधिक जवळून ओळख होते. हा टाइपरायटर आजही त्या ऐतिहासिक प्रवासाची साक्ष देतो.