Vijaykumar Dudhale
अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटातील विश्वसनीय आमदार म्हणून ओळखले जायचे. मात्र, अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर आमदार अशोक पवार यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले.
अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. त्याची सरकारने थकहमी न घेतल्यामुळे आमच्या कारखान्याला कर्ज मिळत नाही, असा आरोप अशोक पवारांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.
अजित पवार यांनी केंदूरमधील सभेत आज अशोक पवारांना त्याचे उत्तर दिले. अशोक पवार यांना घोडगंगा कारखाना नीट चालवता आला नाही. ‘तुझ्या अंगात नाही दम, तू काय माझं नाव घेतो, मी कारखाना बंद पडला’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी अशोक पवारांना सुनावले
दिलीप वळसे पाटील यांचा भीमाशंकर कारखाना कसा जोरात चालला आहे. पराग कारखानाही चांगला चालला आहे की नाही. तुम्ही माझी नावं घेताय. घोडगंगा कारखाना बंद पडला; मग व्यंकटेश कृपा कसा चालला, याचा जरा विचार करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
व्यंकटेश कृपा हा शिरूर तालुक्यातील खासगी कारखाना असून तो अशोक पवार यांच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगितले जाते.
मी कुणाच्या पाच पैशाचा अथवा चहाचासुद्धा मिंधा नाही. तुमचा स्वतःचा खासगी कारखाना चांगला चालतो आणि सहकारी कारखाना कसा बंद पडतो, असा सवालही अजित पवार यांनी अशोक पवारांना विचारला.
आमदार अशोक पवारांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर कर्ज काढलं अन् 25 वर्षे चांगला चालेला कारखाना बंद पडला, असेही अजित पवारांनी नमूद केले..