Rashmi Mane
मुंबईत मेट्रोची Aqua Line म्हणजेच मेट्रो 3चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन केलं.
या उद्धाटन कार्यक्रमामुळे सगळीकडे एका नावाचीच चर्चा आहे. अश्विनी भिडे! सामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत आणि आता तर देशाचे मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही भिडेंचं कौतुक केलं आहे.
अश्विनी भिडे या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) च्या व्यवस्थापकीय संचालिका (MD) आहेत आणि सध्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहतात.
त्यांनी जवळपास 10 वर्षं या प्रोजेक्टसाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. 2015 साली त्यांनी या मेट्रो लाईनचं काम सुरू केलं होतं आणि आता 2025 मध्ये ती जनतेसाठी खुली झाली आहे.
भिडे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनी राहिल्या असून त्या 1995 च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आहेत. त्यांना एमबीएची पदवीही आहे. त्यांनी याआधी अॅडिशनल मेट्रोपॉलिटन कमिशनर, शालेय शिक्षण व क्रीडा सचिव, तसेच अॅडिशनल म्युनिसिपल कमिशनर अशी विविध महत्त्वाची पदं सांभाळली आहेत.
उद्योगपती आनंद महिंद्र यांनी एक्स (ट्विटर) वर लिहिलं आहे. "अश्विनी भिडे यांचे मनापासून आभार. मी त्यांना अनेक वर्षांपूर्वी भेटलो होतो, जेव्हा या कठीण प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. त्यांची दूरदृष्टी, मेहनत आणि चिकाटीमुळे आज मुंबईकरांना मोठी भेट मिळाली आहे.”
‘अॅक्वा लाईन’ साऊथ मुंबईपासून थेट विमानतळापर्यंत जाते आणि पूर्णपणे अंडरग्राऊंड आहे.
या प्रोजेक्टदरम्यान अनेक अडचणी आल्या भूगर्भातील कठीण भाग, समुद्रकिनाऱ्याजवळचं काम, ऐतिहासिक इमारतींच्या खाली टनेल काढणं, आणि सर्वात मोठं वादग्रस्त प्रकरण म्हणजे आरे कारशेड. पण भिडे यांनी प्रत्येक समस्येचा तोडगा काढत काम पुढं नेलं.