Roshan More
वडोदरा येथील भाजप खासदार डॉ. हेमांग जोशी यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१९९१ मध्ये पोरबंदर येथे जन्मलेल्या हेमांग जोशी यांनी २०१० मध्ये ABVP च्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. तेथे त्यांनी मीडिया प्रभारी आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.
जोशी यांनी महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा (MSUB) मधून फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी मानवी संसाधन (HR) क्षेत्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वडोदरा मतदारसंघातून ५ लाख ८० हजारहून अधिक मतांच्या प्रचंड फरकाने शानदार विजय मिळवला.
खासदार झाल्यानंतर त्यांनी 'डिजिटल खासदार कार्यालय' ही डिजिटल संकल्पना सुरू केली, ज्याची खूप चर्चा झाली.
संसदेत झालेल्या गदारोळानंतर राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणाऱ्या भाजप खासदारांमध्ये हेमांग जोशी यांचा सहभाग होता. त्यांनी राहुल गांधी यांच्या राजकीय प्रवासाची तुलना एका अपयशी सॅटेलाइट लाँचिंगशी केली होती.
जोशी यांनी रशिया आणि ब्राझीलमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय 'BRICS' मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यासोबतच ते गुजरातचे एकमेव खासदार म्हणून पूर्व आशियाई देशांच्या विशेष शिष्टमंडळ दौऱ्यात सहभागी झाले होते.
हेमांग जोशी हे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या दोघांच्याही अत्यंत जवळचे मानले जातात. गुजरात युवा मोर्च्यात त्यांनी राबवलेल्या प्रभावी डिजिटल आउटरीच मोहिमेमुळे अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले गेले होते.
पेपर लीक प्रकरणे, वाढती बेरोजगारी आणि AI मुळे बदलणाऱ्या रोजगाराच्या काळात अस्वस्थ तरुणांना तसेच झेन-झीला पक्षाशी जोडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.