Rashmi Mane
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या दाव्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवला होता, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू नेमका कधी झाला आणि त्यांच्या मृत्यूची घोषणा कोणी केली? हे पाहू.
बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाला. डॉ. जलील पारकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची बातमी संध्याकाळी 5:30 वाजता माध्यमांसमोर दिली होती.
दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी ह्रदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला असे पारकर यांनी सांगितले होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला होता, आणि त्यावेळी त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते. असा दावा कदम यांनी काल केला आहे.
डॉ. जलील द. पारकर हे मुंबईतील एक प्रतिष्ठित पल्मोनोलॉजिस्ट (श्वसनतज्ञ) आहेत. त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत अनेक रुग्णांना उपचार दिले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी, डॉ. जलील पारकर हे त्यांच्याशी संबंधित असलेल्या वैद्यकीय तज्ञांपैकी एक होते. त्यांनी बाळासाहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली होती.
डॉ. पारकर बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील शेवटच्या पाच वर्षांपासून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक होते.