Jagdish Patil
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजित घाटगे यांनी देखील पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या नेत्यांमध्ये भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाल्याचं बोललं जातंय. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
मदन भोसलेंच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीत भोसलेंसमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे.
मदन भोसले हे भाजपचे नेते आणि वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
मदन भोसले यांचा राजकीय प्रभाव मोठा असून त्यांचे स्वतंत्र आणि मोठा गट आहे.
सहकारातील जाणकार म्हणून त्यांची ख्याती आहे. आमदार मकरंद पाटलांना वाई विधानसभेत सक्षम पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
भोसले शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता असून आता पुढे काय घडणार? याची उत्सुकता लागली आहे.