Akshay Sabale
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 'एनडीए'च्या 71 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांनीही संधी दिली आहे. यात लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य नसलेल्या जॉर्ज कुरियन यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
जॉर्ज कुरियन यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आलं आहे.
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री पदही कुरिअन यांना दिलं आहे.
कुरियन हे शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दिल्लीत आले होते. पण, मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळताच कुरियन यांना आश्चर्याचा धक्का बसला.
कुरियन यांनी यापूर्वी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. ते केरळमधील कोट्टायमचे रहिवासी असून भाजपचे उपाध्यक्ष आहेत. पेशानं वकील आहेत.
कुरियन वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सतत सहभागी असतात. केरळमध्ये मोदी आणि शाहांच्या प्रचारसभा किंवा कार्यक्रम असतात तेव्हा कुरियन हे भाषांतर करण्यासाठी उभे असतात.
ख्रिश्चन समुदायाशी अधिक जवळीक साधण्यासाठीच भाजपने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचे बोलले जाते.