Amit Ujagare
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड इथं हल्ला करणाऱ्याची ओळख पटली असून शिखांच्या आक्रमक निहंग संघटनेचा हा नेता आहे.
जसपाल सिंग असं याचं नाव असून तो वयस्कर निहंग आहे. बादल यांच्यावर हल्ल्यानंतरचा निहंगचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये हल्ला केल्यानंतर त्याच्या डोक्यावरची पगडी सुटली होती, त्याची पगडी एक जण बांधत असल्याचं यात दिसतं आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक रोहन नीलाभ यांनी सांगितलं की, जसपाल सिंगला अर्थात निहंगला अटक करण्यात आली आहे. हा हल्लेखोर जसपाल सिंग एक सेवादार आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो नांदेडमध्ये सेवाकार्यासाठी येतो.
निहंग यानं आपल्याजवळील कृपाणनं सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. काही जण त्यानं तलवारीनं हल्ला केल्याचंही सांगत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माहिती घेतली असून बादल यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. हा हल्ला म्हणजे सुरक्षेतील चूक नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला या हल्ल्यामुळं इजा झाली असून त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
बादल यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामागे हल्लेखोर निहंगचा काय हेतू होता? त्यानं यासाठी काही नियोजन केलं होतं का? याची चौकशी आता सुरु करण्यात आली आहे. लवकरच याची माहिती कळू शकेल.
दरम्यान, सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेला हल्ला हा पहिलाच हल्ला नसून त्यांच्यावर यापूर्वी पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातही हल्ला करण्यात आला होता. कट्टरवादी शिख संघटना बब्बल खालसाच्या सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.