सरकारनामा ब्यूरो
ओडिसा केडरच्या सिनियर IAS अधिकारी सुजाता कार्तिकेयन यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे.
नियमित सेवानिवृत्तीला 3 महिने बाकी असतानाही सुजाता यांनी 13 मार्च 2025 ला केंद्र सरकारकडे व्हीआरएससाठी मागणी केली होती. याच विनंतीला सरकारने मान्यता दिली.
सुजाता या माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे जवळचे सहकारी व्हीके पांडियन यांच्या पत्नी असून, बिजू जनता दल (बीजेडी) सरकारच्या कालावधीत त्यांची गणना धडाकेबाज कामगिरीसाठी केली जात होती.
ओडिसामध्ये भाजपचे सरकार पहिल्यांदाच सत्तेवर आले आहे. त्यातच त्यांनी व्हीआरएस घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बीजेडी सरकारचा जनतेवर असलेला प्रभाव कमी करण्यासाठी केंद्ग सरकारने त्यांच्या विनंतीला मान्यता दिल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
व्हीआरएस घेतलेल्या सुजाता कार्तिकेयन ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील बलुरिया गावातील मूळ रहिवासी असून, त्या 2000 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
त्यांनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीतून IAS चे प्रशिक्षण घेतले, यावेळी त्यांची भेट पांडियनशी झाली. यानंतर त्यांनी पंजाब केडर सोडत ओडिसा केडर मिळवले.
ओडिसाची राज्याधानी कटक आणि सुंदरगडच्या त्या जिल्हाधिकारी होत्या. बीजेडी सरकारमध्ये 'मिशन शक्ती' सारख्या प्रकल्पांची जबाबदारी होती. स्वेच्छानिवृत्तीवेळी त्या वित्त विभागाच्या सचिव होत्या.