Deepak Kulkarni
मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना युतीची सत्ता आली आहे. या निवडणुकीत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवली.
या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दोन नंबरचा मोठा पक्ष ठरला आहे.
निकालानंतर राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचसोबत महानगरपालिकेच्या महापौर,उपमहापौरपदाची खुर्ची कोणाला मिळणार याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
यातच फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आलं आहे. फुटण्याचा धोका हा सर्वात जास्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आहे. त्यातच ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली आहे.
प्रभाग क्रमांक 157 च्या नगरसेविका डॉ.सरिता म्हस्के 'नॉट रिचेबल' असल्यानं त्या फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आठ वर्षांत त्यांनी सरिता म्हस्के चार पक्ष बदलले आहेत. त्यांनी सर्वात पहिल्यांदा 2017 मध्ये काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस अवघ्या 400 मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
काँग्रेसमध्ये पराभव झाल्यानंतर म्हस्के यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, 2025 साली भाजपमधून शिंदेंच्या शिवसेना पक्षात दाखल झाल्या होत्या.
यंदाच्या निवडणुकीत भाजपनं ही जागा आपल्याकडे ठेवतानाच पुन्हा आकांक्षा शेट्टे यांना उमेदवारी दिली.त्यानंतर म्हस्केंनी शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडली.
शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करुन त्यांनी नगरसेवकपदाची उमेदवारी मिळवली. सरिता म्हस्के या शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर त्या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या आकांक्षा शेट्टेंचा पराभव केला.