Rajanand More
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षांमधील सुधारणांबाबत स्थापन केलेल्या टास्क फोर्सवरून सरकारवर निशाणा साधला.
नव्या समितीत तर एक माजी आयबी प्रमुख, एक आयटी कंपनीचे मालक आणि एक गोमूत्रचे तज्ज्ञही आहेत. यांना शिक्षणाविषयी काय माहिती असणार?, असे प्रियांका म्हणाल्या आहेत. गोमूत्र तज्ज्ञ असा उल्लेख करताच विरोधकांमध्ये हशा पिकला होता.
प्रियांका गांधी यांनी डॉ. व्ही. कामकोटी यांचा गोमूत्र तज्ज्ञ म्हणून उल्लेख केला. कामकोटी यांनी आयआयटी मद्रासमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये एम.एस. आणि पीएच.डी. पदव्या प्राप्त केल्या.
कामकोटी यांनी २००१ मध्ये आयआयटी मद्रासमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. सध्या ते याठिकाणी जानेवारी २०२२ पासून संचालक आहेत.
आयआयटी मद्रासच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, कामकोटी हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टास्क फोर्सचे अध्यक्षही होते.
कामकोटी यांना डीआरडीओ शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार, इंडियन इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशन टेक्नो व्हिजनरी पुरस्कार, 'अब्दुल कलाम टेक्नॉलॉजी इनोव्हेशन नॅशनल फेलोशिप', एसीसीएस जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना दोन वर्षांपूर्वी कामकोटी यांनी गोमूत्राच्या फायद्यांवर भाष्य केले होते. गोमूत्रात जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले होते.
गोमूत्र प्यायल्यामुळे एका संन्याशाला आलेला ताप १५ मिनिटांत गेला होता, असे विधान कामकोटी त्यांनी केले होते. तेव्हापासून त्यांना विरोधकांकडून उपरोधिकपणे गोमूत्र तज्ज्ञ म्हटले जाते.