Jagdish Patil
भारतीय वंशाचे अब्जाधीश पंकज ओसवाल यांची मुलगी वसुंधरा हीला युगांडामध्ये अटक करण्यात आली आहे.
पंकज ओसवाल यांनी युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहित आपल्या मुलीला बेकायदेशीर अटक केल्याचा दावा केला आहे.
तसंच आपल्या मुलीला वॉरंटशिवाय आणि कोणत्याही औपचारिक आरोपाशिवाय अटक केल्याचंही ओसवाल यांनी म्हटलं आहे.
युगांडातील मीडिया रिपोर्टनुसार, वसुंधराचा एका शेफच्या अपहरण आणि हत्येशी संबंध असण्याची तसंच क्रिप्टोकरन्सीच्या काही प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली आहे,
सध्या चर्चेत असणारी आणि देशातील विविध देशांमध्ये व्यवसाय करणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील मुलगी वसुंधरा ओसवाल नेमकी कोण आहे? जाणून घेऊया.
वसुंधराचा जन्म 1999 मध्ये झाला असून ती भारत, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंडमध्ये वाढली आहे.
तिने स्विस विद्यापीठातून फायनान्समध्ये पदवी घेतली असून ओसवाल ग्रुप ग्लोबलचा भाग असलेल्या प्रो-इंडस्ट्रीजवर ती कार्यकारी संचालक आहे.
कंपनीच्या वेबसाइटनुसार, प्रो-इंडस्ट्रीज ही आफ्रिकेतील आघाडीची अत्याधुनिक इथेनॉल उत्पादन कंपनी आहे. तिला 2023 मध्ये ग्लोबल यूथ आयकॉन अवॉर्ड मिळाला आहे.
वसुंधराच्या कुटुंबीयांनी, तिला अतिशय वाईट परिस्थितीत ठेवलं असून अंघोळीची किंवा कपडे बदलण्याचीही सुविधा न दिल्याचा आरोप युगांडातील अधिकाऱ्यांवर केला आहे.