Ganesh Sonawane
आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून लाखो वारकरी पंढरपूरला जातात. जितके भक्त विठुरायाला भेटण्यासाठी आतुर असतात तितकाच आतुर विठुराया देखील भक्तांना भेटण्यासाठी असतो.
विठुरायाच्या कपाळी एक चंदनाचा टिळा तुम्ही पाहिला असेल. या चंदनाच्या टिळ्यावर आणखी एक काळा टिळा लावला जातो.
परंतु हा काळा टिळा का लावला जातो हे अनेकांना माहित नाही. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यातील एक कारण आज आपण पाहुया.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपूरमध्ये येतात. ते रात्रभर तहान-भूक विसरुन दर्शनासाठी रांगेत उभे असतात. पण विठुराया असे म्हणतात की, मी लोकांच्या दर्शनासाठी येथे उभा आहे.
विठ्ठलाच्या म्हणण्यानुसार, मी भक्तांची प्रतीक्षा करतो पण ते माझी प्रतीक्षा करतात हे मला अजिबात पटत नाही. लाखो भाविक येत असल्याने दर्शनासाठी त्यांना रांगेत प्रतीक्षा करावी लागते.
भक्तांना तासंतास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा अपराध नष्ट करण्यासाठी विठ्ठलाच्या भाळी चंदनाच्या टिळ्यावर हा काळा टिळा लावला जातो.
पंढरपूरच्या मंदिरात रात्री झाडू मारला जातो जिथे भक्तांची रांग असते तिथली माती जमा केली जाते. ती माती चाळून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळलं जातं. त्यात अबीराचे मिश्रण टाकून हा टिळा विठ्ठलाच्या कपाळावरती लावला जातो, अशी अख्यायिका आहे.
आपल्या भक्तांची काळजी करणारा आणि त्यांच्या पायाची माती कपाळावर लावून मिरवणारा सर्वांचा दयाळू विठ्ठल म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा आहे.