Deepak Kulkarni
या वर्षी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरावर तुळशीपत्र वाहत प्राणांचं बलिदान दिलं. त्यांच्या त्यागातूनच आपण सर्वजण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत.
पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्त्वाची आणि तितकीच निर्णायक भूमिका महात्मा गांधींनी बजावली होती.
ज्यावेळी भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन दिल्लीत साजरा होत होता,त्या सोहळ्याला महात्मा गांधी उपस्थित नव्हते.
मग या सोहळ्यावेळी महात्मा गांधी नेमके कुठे होते? ते स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी दिल्लीमध्ये कशामुळे उपस्थित नव्हते? याविषयीची माहिती जाणून घेऊयात...
जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधी यांना पत्र पाठवत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचं दोन्ही नेत्यांना कळवलं होतं.
महात्मा गांधी यांनी नेहरू आणि पटेलांना लिहिलेल्या पत्रात देशात जातीय दंगली होत असताना अशा परिस्थितीत आपण स्वातंत्र्य उत्सवात कसे सहभागी होऊ शकतो? असा सवालही केला होता. त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता.
भारत-पाकिस्तान फाळणीमुळे दुखावलेल्या गांधींनी आपल्या पत्रात 15 ऑगस्टला मी आनंदी होऊ शकत नाही. आपण तुम्हाला फसवू इच्छित नसल्याचं सांगतानाच तुम्ही आनंद साजरा करु नका असं मी म्हणणार नाही हेही नमूद केलं होतं.
स्वातंत्र्याच्या दिनाच्या सोहळ्यादिवशी गांधीजी हे बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यातील दंगल थांबवण्यासाठी कोलकात्याला गेले होते. तेथे शांतताव सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी गांधींनी उपोषण सुरू केले.