Rajanand More
प्रसिध्द भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुस्तीतून निवृत्ती घेण्याची त्यांनी केलेली घोषणा मागे घेतली आहे. त्या पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात दिसणार आहेत.
मागील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश यांना पदकापासून वंचित राहावे लागले होते. याच निराशेतून त्यांनी निवृत्ती जाहीर केली होती.
लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये ऑलिम्पिक होणार असून त्यास भाग घेणार असल्याचे विनेश यांनी जाहीर केले आहे. सोशल मीडियात पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
केवळ १०० ग्रॅम वाढीव वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यांत विनेश यांना खेळता आले होते. त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
ऑलिम्पिकनंतर त्यांनी थेट राजकारणात प्रवेश करत काँग्रेसच्या तिकीटावर हरियाणा विधानसभेची निवडणूक लढविली. भाजप उमेदवाराचा पराभव करत त्या विजयी झाल्या अन् विधानसभा गाठली.
पुन्हा कुस्ती खेळण्याचे जाहीर करताना विनेश म्हणाल्या, पॅरिस माझ्यासाठी शेवट होता का, असे लोक विचारतात. माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. अनेक वर्षांनंतर मी आता मोकळा श्वास घेतला आहे.
कामकाज (विधानसभा) समजून घेण्यासाठी मी थोडा वेळ दिला. मला अजूनही खेळ आवडतो. आताही मी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिते. आग कधीही विझत नाही. ती केवळ गोंगाटाखाली दबली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
मी यावेळी एकटी नाही. माझा मुलगा माझ्या टीममध्ये सहभागी होत आहे. तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. तो २०२८ च्या ऑलिम्पिकच्या मार्गावर माझा चोटा चीअरलीडर असेल, अशी भावना व्यक्त केली आहे.