Pradeep Pendhare
महिला आरक्षणाच्या नव्या प्रस्तावामुळे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण यामुळे निवडणुकीचे गणितही बदलणार आहे.
लोकसभेच्या एकूण निवडून येणाऱ्या जागांपैकी जवळपास एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. 850 ही प्रस्तावित कमाल सदस्यसंख्या गृहीत धरली, तर 33 टक्के म्हणजे सुमारे 283 जागा.
एखादा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला, तर त्या जागेवर पक्षांना महिला उमेदवार द्यावा लागेल. त्यामुळे सध्याच्या पुरुष खासदारांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागू शकतो किंवा पक्षात पर्यायी भूमिका स्वीकारावी लागू शकते.
भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांना राखीव मतदारसंघांसाठी सक्षम महिला उमेदवारांची निवड करावी लागेल. राजकीय पक्षांना महिला उमेदवारांचा शोधासाठी धावपळ करावी लागणार आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या जागांपैकी जवळपास एकतृतीयांश जागा संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे महिला आरक्षणात SC-ST महिलांचाही समावेश असेल.
महाराष्ट्रात सध्या 48 लोकसभा जागा आहेत. प्रस्तावित 50 टक्के वाढीनुसार त्या 72 झाल्यास, त्यापैकी जवळपास 24 जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात.
लोकसभेबरोबरच महिला आरक्षणाचा प्रस्ताव राज्यांच्या विधानसभांनाही लागू होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतील महिला आमदारांची संख्याही वाढण्याचा मार्ग तयार होऊ शकतो.
आरक्षित जागांचे रोटेशन म्हणजेच फेरपालट करण्याची तरतूद प्रस्तावात आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेला मतदारसंघ पुढील फेररचनेत बदलू शकतो.
केंद्र सरकारचा प्रस्ताव 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण लागू करण्याच्या दिशेने आहे. मात्र विधेयक मंजुरी, घटनादुरुस्ती आणि डिलिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंमलबजावणीचा मार्ग स्पष्ट होईल.