Rashmi Mane
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 25 हजार रुपये पगाराची शिपाई भरती सुरू असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या जाहिरातीमागचं सत्य वेगळंच आहे.
या मेसेजनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने शिपाई पदासाठी भरती होणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेत 20, तर पंचायत समितीत 10 जागा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हायरल पोस्टमध्ये शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असल्याचं सांगितलं आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपये वेतन मिळणार असल्याचाही दावा आहे.
महाराष्ट्र शासनाच्या DGIPR फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यभरात अशी कोणतीही एकत्रित भरती जाहीर झालेली नाही.
ग्रामविकास विभाग किंवा राज्यातील कोणत्याही जिल्हा परिषदेकडून अशा स्वरूपाची राज्यव्यापी भरती घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हायरल जाहिरातीवर विश्वास ठेवू नका.
जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हा परिषद स्वतंत्रपणे राबवते. काही पदे कंत्राटी किंवा बाह्यस्रोत पद्धतीने भरली जाऊ शकतात.
नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाइट आणि शासनाचे भरतीविषयक आदेश तपासा. अनोळखी लिंकवर वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नका.
सोशल मीडियावरील प्रत्येक भरतीची पोस्ट खरी असेलच असं नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची सत्यता तपासा. अन्यथा नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होऊ शकते.