सरकारनामा ब्यूरो
सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये रेल्वेच्या मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर येत आहे. ही गाडी मिरजहून पुणे मुंबईकडे येत होती. मालगाडीचे डब्बे रात्री आणि दुपारी असे दोनवेळा रुळावरुन घसरल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचा चांगलाच संताप उडाला.
राज्यात महिलांवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अशातच जगभरात शनिवारी (ता.8 मार्च) जागतिक महिला दिन साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत. महिला सुरक्षिततेसह अनेक ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहेत.
आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग येथील एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका होती. आजचा औरंगजेब हा सुतार वाडीत राहतो असं म्हणत तटकरेंवर सडकून टीका केली होती. मात्र,यावेळी आमदार थोरवे यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू तरुणपिढीला स्फूर्ती देणारा असल्याचं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्या ॲड.सायली दळवी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी उचलून धरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजावेळी सत्ताधारी महायुती सरकारची चांगलीच फिरकी घेतली. यावेळी त्यांनी मंत्री भरत गोगावलेंना चिमटा काढला. सुधीर मुनगंटीवारांना उद्देशून ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत तुमचे चांगले संबंध आहेत.तुमच्या ओळखीचा फायदा करुन रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मार्ग काढा आणि महिला मंत्री म्हणून अदिती तटकरेंची नियुक्ती करा.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जाकरी शहा रशीद याला तडीपार करम्यात आलं आहे. जाकीरला एक वर्षासाठी अकोला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत.
राज्यात अवैध होर्डींगचा धंदा तेजीत सुरू असून, नागभीड येथील मुख्य चौकात लावलेले मोठमोठे होर्डींग सर्वसामान्य नागरिकांना दिसतात, पण नगर पंचायतीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिसत नाही.घाटकोपरमधील भीषण दुर्घटनेनंतरही प्रशासनाने डोळे उघडले नाहीत. आता केवळ शहरी भागच नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्रातही अवैध होर्डींग वाढले आहेत. यामुळे मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण झाला आहे. यापुढे अवैध होर्डींगमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार मंत्री आणि सरकार असतील, असा इशारा काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवराय संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहिले. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजीसेना असा उल्लेख केला. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेणारे खरे शिवसैनिक असतात असं वक्तव्य केलं.
प्रसिद्ध बिस्किट उत्पादक कंपनी पार्ले-जी कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. पार्ले ग्रुप ही पार्ले-जी, मोनाको आणि इतर बिस्किटे विकणारी कंपनी आहे. मुंबईतील या कंपनीच्या अनेक ऑफिसवर आयकर विभागाने तपास सुरू केला आहे. आयकर विभागाच्या परकीय मालमत्ता युनिट आणि मुंबईच्या आयकर तपास शाखेकडून ही शोध मोहीम राबविली जात आहे.
औरंगजेबाचं कौतुक करणं आमदार अबू आझमी यांच्या अगलट आलं आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं विधान केल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर त्यांच्या निलंबनावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाचा उदो-उदो करणं हा देशद्रोहच असल्याचं म्हटलं आहे. सभागृहात बोलताना ते म्हणाले, "औरंगजेबाची कबर इथे आहे, त्याला दिल्लीत पोहोचता आलं नाही. महाराष्ट्रातच जीव सोडावा लागला. छत्रपती संभाजी महाराज बलिदान देऊन जिंकले तर औरंगजेब जिंकून देखील हारला. औरंगजेबाचा उदो-उदो करणं हा देशद्रोहच आहे. त्यामुळेच मी अबू आझमींचं निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांचं झालं."
स्वारगेट बसस्थानकातील एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. बलात्काराच्या घटनेनंतर तो त्याच्या गुनाट या गावी गेला होता. त्यानंतर पोलिसांनी गुनाट येथूनच अटक केली. तर गाडेला पोलिसांनी जिथे पकडलं होतं त्याच ठिकाणी पोलिस त्याला घेऊन आले आहेत. पोलिसांना त्याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. त्याच्या मोबाईमध्ये महत्वाचा पुरावा मिळण्याची शक्यता असल्याने पोलिस मोबाईल शोधण्यासाठी त्याला गावी घेऊन आले आहेत.
स्वारगेट बसस्थानक परिसरात तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक गाडेला घेऊन गुनाट (ता. शिरूर) येथे घेऊन जाणार आहेत. दत्ता गाडे लपून बसलेल्या गुनाटमधील शेतात पुणे क्राईम ब्रॅंचचे अधिकारी पाहणी करणार आहेत. कारण तपासासाठी गाडे याचा मोबाईल महत्वाचा ठरणार आहे.
पक्ष बदलण्यासाठी माझा छळ केला जातोय, या माजी मंत्री अनिल परब यांच्या विधानाचा राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार समाचार घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्यांची तुलना होऊ शकते का? सगळे असे कसे बोलत असतात. उबाठामध्ये सगळ्यांच्याच डोक्याचे पांग झालेले आहेत का? सकाळी वेगळेच बोलत असतात. उबाठाला झालंय तरी काय? अनिल परब यांनी असं विधान केले असेल, तर त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल, त्यांना तपासावं लागेल, असा टोला लगावला.
मुंबई काँग्रेस कार्यालयाचे सुमारे 18 लाख रुपयांचे भाडे थकले आहे, त्यामुळे वीजमीटर काढून नेण्यात आलेले आहे. तसेच या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. काँग्रेस पक्ष हा शिवसेनेसोबत गेल्यामुळे संपला आहे, अशी टीका माजी खासदार तथा शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. गोरे यांचा मुखवटा धारण केलेल्या व्यक्तीला साडीचोळी देऊन तिचा सत्कार करण्यात आला आहे. काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे.
पुण्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HRSP) च्या त्रुटी विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. जनतेच्या हिताचा निर्णय असेल तर स्वागत करू. अन्यथा मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत जायची वेळ आली तरी जाऊ, असा इशारा यावेळी आढाव यांनी दिला.
प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेने, आढाव यांच्या नेतृत्वात आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन केले. वाहनांचा नंबर प्लेट बदलताना नियम पाळले जात नसल्याचा आरोप होत आहे. यावेळी बाबा आढाव यांच्याकडून RTO अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते निर्णय घेताना आधी मी होतो आणि नंतर अजितदादाही होते. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदे यांची नाही. ही जबाबदारी आमचीही आहे. खालच्या स्तरावर काही गडबड आढळलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. सगळ्या निर्णयांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ झाला. त्याप्रमाणे पक्ष बदलण्यासाठी माझाही छळ झाला, असे विधान केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब वादात सापडले आहेत. स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याने विरोधक आक्रमक झाले असून परब यांच्या निलंबनाची मागणी सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे नेते धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनाम्याची माहिती मंत्रिमंडळाच्या सभागृहाला माहिती दिली नाही. यातून सभागृहाचा हक्कभंग झाला आहे. नियमभंग झाला आहे. सभागृहाचे कामकाज नियमबाह्यपद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत विरोधकांना सभात्याग केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या या नियमबाह्य कामकाजावर घणाघात केला आहे.
राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर याने छत्रपतींविषयी केलेल्या विधानावरून लक्ष हटवण्यासाठी माझ्या विधानाचा गैरअर्थ लावला जात आहे. सत्ताधाऱ्यांचा यातून मूळ मुद्यांकडे लक्ष विचलित करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी केला.
छत्रपतींविषयी अवमानकरणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा विशेष कायदा याच अधिवेशनात करावा. यात नाॅन-बेलेबलची तरतूद असावी. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावा. ज्यापदावरील व्यक्ती असेल, त्याचे ताबडतोब निलंबनाची तरतूद असावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने 1400 पानांच्या दोषारोपपत्रामध्ये सादर केले आहेत. आता संतोष देशमुख यांच्या उत्तरीय तपासणीतून त्यांना अडीच ते तीन तास मारहाण झाल्याचे समोर आले आहे.मारहाणीमुळे त्यांच्या शरीरातले दोन ते अडीच लिटर रक्त संतोष देशमुख यांच्या शरीरामध्ये साकळले होते.
वाळू घाट चालवतांना कोतवालापासून ते जिल्हाधिकारी, महसूल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलिस शिपाई ते अधीक्षक, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणे-घेणे करण्यात येतं, असे पत्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू करेमोरे यांचं समोर आलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी हे पत्र अधिवेशनात वाचून दाखवले आहे.
तुळजाभवानी मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हे काय मॉर्निंग वॉकची जागा नाही, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. दरम्यान तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याची मागणी पुजारी मंडळाने पूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यात काँग्रेसकडून उद्या सद्धभावना पदयात्रा काढण्यात येणार आहे. आज बीड जिल्ह्यात यात्रेचे आगमन होणार आहे. दुपारी 4 वा ही यात्रा नारायण गडाकडे रवाना होणार आहे. उद्या सकाळी 8 वा ही यात्रा मस्साजोग येथे पोचणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे भेट घेऊन या पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची कारागृहातून सुटका करण्याची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. वाझे याला अटक करण्यात आले तेव्हा, ते अधिकृत कर्तव्य बजावत नव्हते. त्यामुळे, त्याच्यावरील अटकेच्या कारवाईसाठी गृहविभागाच्या पूर्व मंजुरीची आवश्यकता नव्हती, अशी टिप्पणीही न्यायालयाने वाझे याची याचिका फेटाळताना केली.
जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येलाच लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठ गिफ्ट मिळणार आहे. महिला लाभार्थ्यांना त्या दिवशी फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आज मिळणार आहेत.
काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी आजपासून गुजरात दौऱ्यावर आहेत. ते दोन दिवस गुजरातमध्ये असणार आहेत. काल राहुल गांधी यांनी मुंबईत धारावी परिसराचा दौरा केला. लेदर कामगारांशी त्यांनी संवाद साधला. दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही गुजरात दौऱ्यावर आहेत. ते नवसारी येथे 'लखपती दिदी'यांच्याशी संवाद साधणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.