Amit Ujagare
इतर देशांची सुरक्षाविषयक अतिसंवेदनशील माहिती गोळा करुन त्याद्वारे त्या देशांना कमकुवत करण्यासाठी जगभरात सरकार पुरस्कृत हेरगिरी केली जाते. यासाठी बऱ्याचदा हनीट्रॅपचा वापर केला जातो. नुकतेच कॉम्प्युटरमधील AI चीप बनवणारी प्रसिद्ध अमेरिकनं कंपनी NVIDIAचे सीईओ जेन्सन ह्युआंग यांना हनीट्रॅपमध्ये अडकल्यानं राजीनामा द्यावा लागला होता. यापार्श्वभूमीवर जगभरात गाजलेली हनीट्रॅपची प्रकरण जाणून घेऊयात.
मे २०२३ मध्ये महाराष्ट्र एटीएसनं DRDO चे वरिष्ठ वैज्ञानिक प्रदीप कुरुलकर यांना अटक केली होती. पुण्यातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे ते संचालक होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जारा दासगुप्ता नावाच्या महिलेच्या ते संपर्कात आले होते. ही महिला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ची ती एजंट असल्याचा आरोप आहे. या महिलेला कुरुलकर यांनी भारतीय संरक्षणदलातील अत्यंत संवेदनशील माहिती पुरवल्याचं समोर आलं होतं. हा खटला अद्यापही सुरु आहे.
फेब्रुवारी २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांनी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली होती. ते देखील सोशल मीडियावरुन महिलेच्या बनावट प्रोफाईलच्या संपर्कात येऊन हनीट्रॅपमध्ये अडकले होते. या व्यक्तीशी त्यांनी हवाई दलाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती शेअर केली होती.
डिसेंबर २०१९ मध्ये भारतीय नौदलाशी संबंधित एक हेरगिरीचं नेटवर्क समोर आलं होतं. तपास एजन्सीजच्या माहितीनुसार, काही नौदल कर्मचारी सोशल मीडियावरील महिलांच्या प्रोफाईलच्या संपर्कात आले होते. या कथित महिलांकडून नौदलासंबंधीची संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला होता. NIAनं या प्रकरणाचा तपास केला होता.
१९६३ मध्ये ब्रिटनचे युद्ध मंत्री जॉन प्रोफ्युमो यांचा मॉडेल क्रिस्टीन किलर यांच्याशी संबंध आला होता. या मॉडेल महिलेचा संपर्क सोवियत संघाचे नौदल अधिकारी येवगेनी इवानोव यांच्याशी होता. यामुळं ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. याप्रकरणात प्रोफ्युमो यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण याप्रकरणात सुनियोजित हनीट्रॅप घडवून आणला गेला नव्हता.
१९५० च्या दशकात मॉस्कोस्थित ब्रिटिश दुतावासात तैनात असलेल्या जॉन वासल यांना सोव्हिएत संघाच्या एजंट्सकडून खासगी फोटोंवरुन ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. या दबावाखाली त्यांनी रॉयल नेव्हीशी संबंधित गोपनिय माहिती पुरवली होती. त्यामुळं १९६२ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. तसंच कोर्टानं १८ वर्षांची शिक्षा सुनवाली होती.
१९८० च्या दशकात अमेरिकन मरीन गार्ड असलेले क्लेटन लोनट्री मॉस्को येथील अमेरिकनं दुतावासाच्या सुरक्षा व्यवस्थेशी जोडले गेले होते. याच काळात त्यांचे सोव्हिएत संघाची गुप्तचर अधिकारी महिला वायोलेटा सेइना यांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांच्यावर रशियाची गुप्तचर संस्था KGBला अमेरिकेच्या सुरक्षेसंबंधींची संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप झाला. यानंतर त्यांचं कोर्ट मार्शल झालं.
१९८६ मध्ये इस्रायलचे अण्वस्त्र तंत्रज्ञ मोर्देखाई वनुनु यांनी देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित गोपनिय माहिती सार्वजनिक केली होती. यानंतर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनं त्यांना पकडण्यासाठी टीम तयार केल्या होत्या. एका महिला गुप्तहेरानं सिंडी नावान त्यांच्याशी संपर्क केला होता आणि त्यांना रोममध्ये बोलावून घेतलं होतं. तिथं मोसादच्या एजंट्सनं त्यांना पकडलं आणि इस्रायलला घेऊन गेले. त्यानंतर त्यांना १८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.