धुळे :  सुटीवर असूनही राहुल रेखावारांनी  कामाला जुंपल्याने विभागप्रमुख घामाघूम! 

तरुण आणि नव्या दमाचे जिल्हाधिकारी लाभल्याने त्यांचा कारभारातील दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा राहील, हे स्पष्ट आहे. शिवाय जिल्हाधिकारी म्हणून अनेक वर्षांनंतर प्रथमच 'आयएएस' अधिकारी लाभले आहेत. त्यांची कामाची हातोटी काहीशी वेगळी राहत असल्याने श्री. रेखावार यांच्याविषयी माहिती संकलित करून आपली पुढील कामकाजाची दिशा कशी ठेवावी, या नियोजनात कर्मचारीही गर्क आहेत.
Rahul-Rekhawar
Rahul-Rekhawar

धुळे :  महिनाभर सुटीवर असले तरी नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विशेष कामकाजात गुंतवून ठेवल्याने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख घामाघूम होत असल्याचे चित्र आहे. 

सुटीनंतर कामकाज सुरू करताना जिल्ह्याची भौगोलिक आणि प्रशासकीय रचना कळावी, नकाशांआधारे निर्णय घेऊन वेळेची बचत करता यावी म्हणून पूरक माहितीसह नकाशे तयार करण्याची सूचना त्यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिली आहे. 

परभणी महापालिकेचे आयुक्त असताना श्री. रेखावार महिनाभराच्या सुटीवर गेले. त्याच वेळी त्यांची येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. येथे 20 एप्रिलला पदभार स्वीकारल्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले. ते 22 मेस रुजू होतील. 

 असे असले तरी सुटीवर जाताना कामकाजाबाबत काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी इतर अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच त्यांच्याशी ते दूरध्वनीद्वारे संपर्कात आहेत. ते रुजू होण्यापूर्वी किती विभागांकडून नकाशे तयार झाले, याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी 11 मेस प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी आढावा बैठकीचे नियोजनही केले आहे. 

महसूल यंत्रणा, जिल्हा परिषदेचे विविध विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, 'एमआयडीसी'सह अन्य विविध विभागांकडून नकाशे तयार झाल्यानंतर जिल्ह्याची भौगोलिक व प्रशासकीय रचना लवकर लक्षात येऊ शकेल. त्यांचा निर्णय प्रक्रियेत उपयोग होऊ शकेल.

जिल्ह्यातील रस्ते, महामार्ग, पाणी, आरोग्य सेवा- सुविधा, शिक्षण, शेती, उद्योग यासह विकासाशी निगडित जाळे कसे विणले गेले आहे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अभियंते, विविध खात्याचे अधिकारी आदींची कार्यालये नेमकी आहेत कुठे, प्रकल्प वा सेवा विस्तारीकरणाची मागणी झाल्यास त्याचा परिक्षेत्रात कसा आणि किती लाभ मिळू शकेल, आदी माहिती नकाशांद्वारे लवकर लक्षात येऊ शकेल या विचारातून ही कार्यप्रणाली जिल्हाधिकारी रेखावार अमलात आणत आहेत. 

तसेच जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही. पर्यायाने नकाशांसह पूरक माहितीआधारे निर्णय प्रक्रिया राबविता येऊ शकते, असा विचार यामागे आहे. 
 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com