प्रताप जाधवांना भाजप आमदारांनी तारले; शिवसेनेच्या मतदारसंघात कमी लिड

प्रताप जाधवांना भाजप आमदारांनी तारले; शिवसेनेच्या मतदारसंघात कमी लिड

खामगाव : लोकसभा निवडणुकीत मोदींच्या सुप्त लाटेवर खासदार प्रतापराव जाधव यांनी सर्व राजकीय विश्लेषकांची सर्व आकडेमोड व  अंदाज खोट ठरवित तब्बल १ लाख ३३ हजार २८७ मतांची आघाडी घेवून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद शिंगणे यांचा पराभव केला.

यामध्ये जाधव यांना ५ लाख २१ हजार ७७ तर आघाडीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ६९० व वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना १ लाख ७२ हजार ६२७ मते मिळाली.यात एक विशेष बाब म्हणजे खासदार जाधव यांना भाजपासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भरभरुन लिड मिळाला आहे. तर याउलट शिवसेनेसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये हवा त्या प्रमाणात लिड मिळालेला नाही. ऐवढेच काय तर खासदार  जाधव यांच्या होम टाऊन मेहकरमध्ये  सुध्दा त्यांना कमी मताधिक्य मिळाले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेचे मनभेद वाढत गेले. त्यावरुन या लोकसभा निवडणुकीत युती होण्याची आशा धुसुर झाली होती. परंतु  ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजप  व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत युतीची घोषणा करुन जागा वाटपाचा तिढा देखील सोडविला. युतीच्या या निर्णयाचे दोन्ही बाजुनीं स्वागत करण्यात आले. आता मतांचे विभाजन टाळल्या जाईल हे स्पष्ट दिसते होते आणि झालेही तसेच राज्यात भाजप शिवसेनेच्या युतीने मागील वेळी मिळविलेल्या विजयात सातत्य कायम ठेवले.

याच धर्तीवर बुलडाणा लोकसभा मतदार संघात खासदार प्रतापराव  जाधव यांना देखील युती झाल्याचा चांगलाच फायदा झाला. युतीची सत्ता असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात त्यांना भरभरुन मते मिळाली. परंतु शिवसेनेसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात मात्र त्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये सिंदखेड राजा येथे जाधव यांना ६ हजार ५०० मतांचे मताधिक्य मिळाले वास्तविक पाहता येथे सध्या शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर हे आमदार आहेत. तर जाधव यांचे होमटाऊन असलेले मेहकर येथे त्यांना अपेक्षित असे मताधिक्य मिळू शककलेले नाही. त्यांना केवळ ७ हजार ५३६ च्या ऐवढे मताधिक्य मिळाले आहे. तसेच बुलडाणामध्ये सुध्दा त्यांना केवळ २५ हजार ९८६ ऐवढे मताधिक्य मिळाले. येथे सुध्दा शिवसेनेचे मजबूत संघटन आहे.

या उलट  चिखली हा विधानसभा मतदार संघ भाजपासाठी राखीव आहे येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांची  मोठी फळी असून त्यांनी अत्यंत मेहनत घेतल्याचे निकालावरुन दिसून येते.  या मतदार संघातून जाधव यांना २३ हजार ८६१ ऐवढे मताधिक्य मिळाले. तर घाटाखालील  जळगाव जामोद व खामगाव जेथे आ.डॉ.संजय कुटे व आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर भाजपाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून खासदार जाधव यांना भरभरुन लिड मिळाला आहे.   जळगाव जामोद मतदार संघातून आ. डॉ. संजय कुटे यांनी ३४ हजार ५६९ लीड मिळवून देत आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मतदारसंघातील भाजप व शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र आणून  विजयाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली असे म्हटले तरी चालेल. त्यांच्या पाठोपाठ अ‍ॅड.आकाश फुंडकर यांनी देखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपल्या संघटन कौशल्याने  मतदारसंघातील युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत खा. जाधव यांना खामगाव विधानसभा मतदार संघातून सुमारे ३२ हजार ६४८ चा लिड मिळवून दिला. राज्याचे दिवंगत कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर  यांच्या निधनानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्यावरच  सर्व धुरा होती. परंतु त्यांनी आपल्या कार्यकौशल्य व उत्कृष्ट नियोजनाची चुनुक दाखवून दिली. त्यामुळे येणाऱ्या  विधानसभा निवडणूकीच्या  दृष्टीने जळगाव जामोद व खामगाव मतदार संघात भाजपाची बाजु बळकट असल्याचे दिसून येत आहे. या निकालीवरुन जाधव यांना शिवसेनेसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघात ४० हजाराचा तर भाजपासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघामध्ये ९० हजारचा लिड मिळाला असल्याचे दिसून येते.

लोकसभेच्या या निकालांवरुन  शिवसेनेच्या आमदारांना आपली मतदार संघामध्ये त्यांनी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे अत्यंत गरजे आहे. असे केले तरच  पाच महिन्यांनी होवू  घातलेल्या  विधानसभा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणल्या जाईल. लोकसभेच्या निवडणुकांवर  विधानसभेची गणिते अवलंबुन असल्याने खामगाव व जळगाव जामोद मतदार संघात खा. जाधव यांना मिळालेले मताधिक्य पाहता  आ.अ‍ॅड.आकाश फुंडकर व आ.संजय कुटे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे.

भाजप- सेना मतदारसंघ निहाय लीड
खामगाव  - ३२ हजार ६४८
जळगाव -३४ हजार ५६९ 
बुलडाणा - २५ हजार ९८६
मेहकर - ७ हजार ५३६
चिखली - २३ हजार ८६१
सिंदखेडराजा -६हजार ५००

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com