जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो....

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिक आणि त्यांचे लक्षावधी चाहते आज त्यांना मनोमन आठवत असतील. अमोघ वक्तृत्व, एक घाव दोन तुकडे करण्याचा स्वभाव आणि बिनधास्त आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या या नेत्याने एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रावर गारुड केले होते. ते आपल्यात नाहीत; पण लक्षावधी चाहत्यांच्या मनात मात्र ते अजूनही घर करून आहेत.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो....

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिक आणि त्यांचे लक्षावधी चाहते आज त्यांना मनोमन आठवत असतील. अमोघ वक्तृत्व, एक घाव दोन तुकडे करण्याचा स्वभाव आणि बिनधास्त आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या या नेत्याने एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रावर गारुड केले होते. ते आपल्यात नाहीत; पण लक्षावधी चाहत्यांच्या मनात मात्र ते अजूनही घर करून आहेत. 

त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही नवीन घडले की बाळासाहेब ठाकरे यांची आठवण निघतेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर! असा प्रश्‍नही हमखास चर्चेच्या ओघानेच येतो. 

बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्व मान्य नसलेले त्यांचे विरोधकही बाळासाहेब आज असायला हवे होते, असे चटकन बोलून जातात. महाराष्ट्राच्या राजकारणावर गप्पांचा फड रंगला आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण निघाली नाही असे होतच नाही. 

"शिवसेनाप्रमुख' हे पद आपल्यासाठी पंतप्रधानपदापेक्षा मोठे आहे असे बाळासाहेब ठाकरे मोठ्या अभिमानाने सांगत असत. मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्वाभीमानासाठी स्थापन झालेली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नेतृत्व गुणांवर आणि असामान्य संघटन कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली.

नव्वदच्या दशकात महाराष्ट्राच्या गावागावांत वाघाचे चित्र असलेल्या शिवसेनेच्या शाखेचे फलक झळकू लागलेले होते. आपल्या निर्भीड, सडेतोड आणि आक्रमक विचारांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवलाच; पण देशाच्या राजकारणातही शिवसेनेचा दबदबा निर्माण केला. 

बाळासाहेब ठाकरे यांना अमोघ वक्‍तृत्वाचे जणू वरदानच लाभलेले होते. बाळासाहेब ठाकरेंची सभा कोणत्याही शहरात असो तेथे हमखास गर्दी ही असायचीच. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडणूक प्रचार सभांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये गर्दीचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडून नवे उच्चांक 1988 ते 2000 या काळात प्रस्थापित केले. त्यांच्या सभेला जमलेली गर्दी पाहताना डोळे विस्फारायचे आणि विराट, विशाल, अतिभव्य आणि अभूतपूर्व अशी विशेषणे कागदावर उमटू लागायची.

गर्दीची उत्सुकता तुटेपर्यंत ताणली गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची व्यासपीठावर एंट्री व्हायची ती फटाक्‍यांच्या आतषबाजीत आणि टाळ्यांच्या कडकडाटात. पांढरेस्वच्छ कपडे, त्यावर भगवी शाल, गळ्यात रुद्राक्षाची माळ, पूर्ण मागे घेतलेले केस, कपाळावर भगवा टीळा लावलेले बाळासाहेब श्रोत्यांना अभिवादन करण्यासाठी हात उंच करायचे तेव्हा मनगटावर बांधलेली रुद्राक्षांची माळ जवळ बसलेल्यांना दर्शन देऊन जायची.

व्यासपीठावर लगबग सुरू व्हायची. "हिंदुहृदयसम्राट' माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो' "जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी आसमंत दुमदमायचा. हजारो कंठातून निघालेल्या जयजयकारातून शहराच्या गल्लीबोळापर्यंत सभा सुरू झाल्याची वर्दी पोहोचायची. 

बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर आल्यावर ते आधी वळायचे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडे. ढोलताशांच्या गजरात तुताऱ्या वाजू लागायच्या आणि "जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणांनी आसमंत भरून जायचा. शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब अभिवादन करायचे. 

दरम्यानच्या काळात किल्ला लढविलेले शिवसेनेचे नेते/ उपनेते त्यांच्या मानमरातबाप्रमाणे आसनस्थ झालेले असायचे. मग शिवसेनाप्रमुख माईकचा ताबा घ्यायचे. तेव्हा पुन्हा घोषणांना उधाण यायचे. कौतुकाने पुरे आता असे ते दटावायचे आणि सभेत "पिन-ड्रॉप सायलेन्स' अर्थात शांतता पसरलेली असायची.

"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' या वाक्‍याने त्यांचे भाषण सुरू होताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट ठरलेला असायचा. अमिताभ बच्चनलाही कॉम्पलेक्‍स यावा, अशा कडक खर्जातील आवाजात बाळासाहेबांचे भाषण सुरू होई आणि कधी तासभर, कधी दीड तास त्यांच्या वाणीचा धबधबा अखंड कोसळत राही. 

शरद पवार, सोनिया गांधी, मुलायमसिंग यादव आणि पाकिस्तान ही नावे त्यांच्या भाषणात हमखास यायची. आपल्या राजकीय विरोधकांवर मोठ्या त्वेषाने आणि आक्रमक भाषेत ते शाब्दिक हल्ले चढवायचे.

शरद पवारांवर तर त्यांचे विशेष "प्रेम' असे. जणू काही शरद पवार समोरच उभे आहेत आणि बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी सर्वांसमक्ष भांडतायत अशा शैलीत बाळासाहेब शरद पवारांच्या ध्येयधोरणापासून ते व्यक्तिमत्वापर्यंत तुटून पडायचे. राजकीय विरोधकांचा कधी एकेरी उल्लेख करायचा. कधी विरोधकांच्या भाषणाची-बोलण्याची नक्कल करायची. कधी उपहासाने तर कधी उपरोधाने विरोधकांना टोमणे लगवायचे.

कधी त्यांचे शब्द विस्तवाचे निखारे बनून विरोधकांवर कोसळायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगाचे आणि विद्यमान राजकीय परिस्थितीचे साम्यस्थळ ते शोधून काढायचे. मग आपण मावळे आणि विरोधक औरंगजेबाचे सरदार या भावनेतून टिकेचा भडिमार होई. आरोपांची तोफा डागल्या जात असत. 

पाकिस्तानचे निमित्त करून आक्रमक आणि ज्वलजहाल हिंदूत्वाची भूमिका ते अशा पद्धतीने मांडत, की भाजप आणि आरएसएसचे हिंदूत्व त्यांच्यासमोर खूपच फिके वाटू लागे. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा बिनधास्तपणा असायचा. सर्वसामान्य माणूस ज्या ज्या गोष्टींना वचकतो, घाबरतो, दचकतो त्या गोष्टींवर बाळासाहेब आवर्जून हल्ला चढवीत असत.

टॉपचे राजकारणी आणि नोकरशहा यांचा समाचार तर ते नेहमीच घेत असत पण अधूनमधून पोलिस, न्यायालये आणि पत्रकारांवरही ते ताशेरे ओढत असत. कॉंग्रेसची जवळीक असलेले चित्रपट कलावंत, नाटककार, साहित्यिक यांचाही ते आपल्या खास "ठाकरी शैली'त समाचार घेत असत. आपल्या भाषणात परिणामकारिकता वाढविण्यासाठी ते मधूनमधून पुस्तकात, साप्ताहिकात, दैनिकांत प्रसिद्ध झालेले मजकुराचे दाखले देत असत. 

विरोधकांचा उल्लेख करताना गाढव, मुर्ख, मैद्याचे पोतं, असे खासगी भांडणात वापरली जाणारी विशेषणे बिनधास्तपणे त्यांच्या तोंडी असत. बाळासाहेबांना योग्य वेळी योग्य तो कागद हातात आणून देण्यासाठी एखादा जवळचा कार्यकर्ता व्यासपीठावर दक्ष स्थितीत असे.

सभेत उच्चारलेल्या पहिल्या वाक्‍यापासून ते समारोपाच्या "जय हिंद जय महाराष्ट्र'पर्यंत श्रोत्यांवरील त्यांची पकड कायम असे. त्यांच्या सभेतून कोणी उठून जात नसे. अगदी राष्ट्रगीताचे जणगणमन सुद्धा ते धीरगंभीर आवाजात गात असत आणि त्यांचाबरोबर श्रोतेही राष्ट्रगीत अभिमानाने म्हणताना दिसत. सभेच्या शेवटी "भारतमाता की जय!' या घोषणेला श्रोते मुठी आवळून हात हवेत उंचावून प्रतिसाद देत असत, तो क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांची लगबग उडालेली असे. 

आपल्या भाषणात आपल्या शब्दसामर्थ्याच्या जोरावर श्रोत्यांना खदखदून हसविणारा, क्वचित प्रसंगी रडविणारा, देशप्रेमाची ऊर्जा निर्माण करणारा हा असामान्य वक्ता होता. नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली होती.

जिथे जिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या तिथे तिथे शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले असा इतिहास आहे. त्यांच्या सभांनी निर्माण झालेली लाट मतपेटीत परावर्तित करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अत्यंत भक्कमपणे केली.

आमदार, खासदारांपेक्षाही तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख ही पदे मोठी वाटण्याचा तो काळ होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दासाठी कुठेही, केव्हाही आणि काहीही करण्याची तयारी असलेली शिवसैनिकांची फळी त्यांनी तालुकापातळीपर्यंत बांधलेली होती. अशा कडवट आणि कट्टर शिवसैनिकांमुळेच बाळासाहेबांच्या माघारीदेखील ऐन मोदी लाटेत शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले, हे विसरता येणार नाही. 

त्यामुळेच आज बाळासाहेब ठाकरे आपल्यात नसले तरी ठाकरे या नावाचे गारुड मराठी मनावरून उतरायला तयार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com