'बजरंग' विजय मिळवणे सोपे नाही ! 

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे तर, वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव मैदानात आहेत. ही निवडणुक त्रिशंकू वाटत असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप या दोन पारंपरिक पक्षामध्येच थेट लढत पाहायला मिळेल.
'बजरंग' विजय मिळवणे सोपे नाही ! 

गल्ली ते दिल्ली सत्ता, पंकजा मुंडे पालकमंत्री; तसेच जिल्ह्यात पाच आमदार अशी भाजपची सध्या तरी जमेची बाजू आहे. तर, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये असलेला दुरावा,

बीड, गेवराई माजलगांव मतदारसंघात असलेले अविश्वासाचे वातावरण, तसेच मराठा. धनगर आणि मुस्लिम आरक्षणांसारखे कळीचे मुद्दे हे या निवडणुकीत परिणामकारक ठरू शकतात. त्याचबरोबर, सरकारविरोधी असलेल्या रोषालाही सामोरे जावे लागणार हे नक्की ! 

दुसऱ्या बाजूला झालेल्या चुका विसरून आगामी विधानसभेला राष्ट्रवादीकडून केजच्या उमेदवार नमिता मुंदडाच असणार असा शब्द विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी दिला आहे. या नंतर मुंदडा-सोनवणे गटाचे मनोमिलन झाले आहे. राष्ट्रवादीसाठी पक्षांतर्गत गटबाजी, नवखा उमेदवार तसेच माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखे दुखावलेले नेते ही राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. 

2014 च्या निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व आणि मोदी लाट असल्याने त्यांनी सव्वा लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत कन्या प्रीतम मुंडे यांच्या विरोधात प्रमुख विरोधक राष्ट्रवादीसह शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता.

त्यावेळी सहानुभूतीच्या लाटेत प्रीतम मुंडे जवळपास 7 लाख विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. पण, यावेळी परिस्थिती बदललेली असेल. प्रामुख्याने तुलना करायची झाल्यास 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांची परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. 

2009 लोकसभा निवडणूक (दिवंगत गोपीनाथ मुंडे विरुद्ध रमेश आडसकर) 
2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे मैदानात उतरले होते. यामुळे 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उमेदवार मिळत नाही अशा चर्चांना उधाण आले तर, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा कुठलाही नेता गोपीनाथ मुंडे यांच्या समोर उभा राहण्याची हिंमत करत नाही,

सर्वजण माघार घेत आहेत अशा चर्चा सर्वत्र रंगत होत्या. यात तथ्यही असावे म्हणून राष्ट्रवादीकडून अत्यंत नवखा असलेल्या केवळ जिल्हा परिषदेचा अनुभव असलेल्या रमेश आडसकरसारख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली. परंतु, या नवख्या उमेदवारानेही बीड लोकसभा मतदारसंघातून तब्बल 4,13,042 मते घेत चांगलीच टक्कर दिली. गोपीनाथ मुंडे यांचा या निवडणुकीत 1 लाख 40 हजार मतांनी विजय झाला. गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी हा विजय एवढा सहज मिळालेला नक्कीच नव्हता. 

2014 लोकसभा निवडणूक (दिवंगत गोपीनाथ मुंडे विरुद्ध सुरेश धस) 
2014च्या लोकसभा निवडणुकीत यावेळीही गोपीनाथ मुंडे यांनाच मैदानात उतरवले गेले. तर राष्ट्रवादीकडून पुन्हा उमेदवाराचा शोध सुरू झाला.

हा शोध तत्कालीन राज्यमंत्री सुरेश धस यांच्यावर संपला. मोदी लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा पाहता हा विजय त्यांना एकहाती मिळेल असे वाटत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सुरेश धस यांनी तब्बल 4,99,541 एवढी मते मिळवली. गोपीनाथ मुंडे यांना अगदी सोपा वाटणारा हा विजय मोदी लाटेतही 1 लाख 35 हजार मतांनी मिळाला आणि 2009 च्या तुलनेत त्यांचे मताधिक्‍य कमी झाले हेच खरे. 

2009 आणि 2014 च्या तुलनेत पाहायला गेल्यास आता परिस्थिती बदललेली आहे. डॉ. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय त्यांचे बंधू धनंजय मुंडे हेही सध्या राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा वाद हा कायमस्वरूपी चर्चेत राहिला आहे. त्यातही धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे महत्त्व खूप वाढले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने धनंजय मुंडेंचा बीड जिल्ह्यात वापर करण्यापुरता विचार न करता राज्यभरात त्यांना महत्त्व दिले. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे खास महत्त्व आहे. सध्या बजरंग सोनवणे यांना शेतकरीपुत्र म्हणून मिळत असलेली मान्यताही लक्षात घेण्यासारखी आहे.

पण राष्ट्रवादीसाठी पक्षांतर्गत गटबाजी, नवखा उमेदवार तसेच माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखे दुखावलेले नेते राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. सोबत, जिल्ह्यातील बदललेली जातीय समीकरणेसुद्धा महत्त्वाची आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस गटातील गटबाजी नाहीशी होऊन पक्ष एकदिलाने निवडणुकीला सामोरे गेल्यास विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना 'बंजरंग' विजय मिळणे सोपे नाही हे नक्की ! शेवटी जिल्ह्यातील एकूण मतदार 20 लाख मतदारांच्या हाती या दोन उमेदवारांचे भवितव्य आहे हे नक्की !!  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com