आमदार राजेश क्षीरसागर, बरे झाले तुम्हीच संपत्तीवर बोलला! 

आमदार राजेश क्षीरसागर, बरे झाले तुम्हीच संपत्तीवर बोलला! 

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली असा प्रश्‍न जाहीरपणे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला आहे. हा प्रश्‍न जरूर दादांना लागू आहे; पण यानिमित्ताने काही राजकारणी मंडळी झटपट कशी श्रीमंत होतात, गाड्यांची रांग दारात कशी लावतात. राजेशाही थाटाला लाजवेल अशा पद्धतीने घरातले समारंभ कसे करतात आणि एक दोनदा निवडून येऊन पुढच्या पाच पिढ्यांची कमाई कशी करून ठेवतात या दबक्‍या पण कार्यकर्त्यांत ठसठसणाऱ्या वेदनेला तोंड फुटले आहे. चंद्रकांतदादा त्यांच्या संपत्तीचा किंवा खर्चाचा हिशोब कसा व कधी सादर करतील हा पुढचा भाग आहे; पण बरे झाले राजेश क्षीरसागर यांनीच "झटपट श्रीमंती'वर बोलून एक बॉंब टाकला आहे. या बॉंबचा झटका अनेकांना बसणार हे निश्‍चित आहे. कारण डोळे विस्फारतील एवढ्या संपत्तीचे दर्शन गेल्या काही वर्षांत कोल्हापूरकरांना होत आहे. 

चंद्रकांतदादांच्या वरील आरोपाने या विषयाला तोंड फुटले आहे. दादांनी राज्याच्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात जरूर मुसंडी मारली आहे. संघटन शक्ती आहे. वक्‍तृत्व आहे. संयम आहे. अनेक गरजू, गरिब खेळाडूंनाही मदतीचा हात दिला आहे. काही तरी करायची जाणीवही आहे; पण अलीकडे "तुम्ही पैशाची चिंता करू नका. पैसे कसे द्यायचे ते मी बघतो' या वाक्‍याने त्यांच्या प्रत्येक भाषणाचा शेवट ठरलेला आहे. सुरवातीला हा मुद्दा चांगला वाटला; पण नंतर नंतर एवढा पैसा यांच्याकडे कोठून आला याकडे लोकांच्या चर्चेचा सूर वळला. राजेश क्षीरसागर यांनी जरूर हा मुद्दा उचलला; पण आता भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी पलटवार करत क्षीरसागर यांच्याकडेच एवढी संपत्ती कोठून आली, त्यांच्या मुलाचा लग्नाचा खर्च कसा केला हा नव्या चर्चेचा मुद्दा पुढे आणला आहे. ही परस्परांवरील आरोपाची चर्चा रंगेल किंवा थांबेल हा पुढचा भाग आहे. पण एकूणच कोल्हापुरातल्या काही राजकारणी, समाजकारणी व प्रत्येकवेळी "आंदोलन" करण्याची भाषा करणाऱ्यांच्या झटपट श्रीमंतीची खूप चर्चा काही दिवसांपासून कोल्हापुरात आहे. इन्कमटॅक्‍सला माहीत नाही असली रंजक माहिती लोकांपर्यंत पोहोचली आहे. किती खरी किती खोटी हा वेगळा प्रश्‍न आहे. पण केवळ पैशाभोवती फिरणारे राजकारण, समाजकारण व आंदोलनामुळे खूप वाईट संदेश तळागाळापर्यंत पोहोचला आहे. 

राजकारणात, समाजकारणात, शैक्षणिक क्षेत्रात जो आला तो प्रत्येकजण पैसा मिळवून गब्बर झाला असे चित्र नक्कीच नाही. शाहूवाडीचे माजी आमदार, ज्यांनी त्याकाळात उदयसिंगराव गायकवाड यांना पराभूत केले ते राऊ पाटील आजही थरथरत्या हाताने शेतात काम करतात हे वास्तव आहे. 30 वर्षे सांगोल्याचे आमदार असलेले गणपतराव देशमुख एस.टी.ने आजही फिरतात हे लोक पाहात आहेत. कोल्हापूर शहरातून चारवेळा निवडून आलेले त्र्यंबक सिताराम कारखानीस अखेरपर्यंत म्हाडाच्या पत्र्याचे छप्पर असलेल्या घरात राहात होते हे सत्य आहे. ही उदाहरणे केवळ प्रतिकात्मक. शंकर धोंडी पाटील यांची जीप तर "वडाप' वाहतूकच होती. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला शंकर धोंडी जीपमध्ये घ्यायचे. आज दारात एकाहून एक किंमती गाड्यांची रांग असलेल्या नेत्यांना कदाचित हे माहीत नाही. राजकारणात जसे चांगले लोक आले. तसे वाईटही आले. पण वाईट मार्गातून मिळालेल्या पैशातून ते खूप मोठे झाले. कारखाने विकत घेण्यापर्यंत ते जाऊन पोहोचले. जेथे तेथे पैशाचा वापर करू लागले. आणि पैशाशिवाय निवडणूक लढवता येत नाही हे समाजमनावर ठसवण्यात ते यशस्वी झाले. आणि राजकारणाचे सारे पदरच त्यांनी गढूळ करून टाकले. यातून काही कारखाने काही सहकारी बॅंक डबघाईला आल्या, बुडाल्या; पण त्यावरच्या पदाधिकाऱ्यांच्या शर्टची इस्त्री कधी विस्कटली नाही. आपण संस्था बुडवल्याची खंतही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही. 

दूध संघ, शिक्षण संस्था, साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सहकारी आर्थिक संस्था यावर वर्चस्वासाठी पैसा हेच मोठे भांडवल झाले आहे. महापालिका, आमदार खासदारकीचा खर्च सोडाच पण ग्रामपंचायत निवडणूक पंधरा-वीस लाखांत आता होत नाही ही परिस्थिती आहे. लोकही "किती देणार' अशीच भाषा नेत्यांकडून करत आहेत. हा नेता गैरमार्गाने भरपूर मिळवतो तर त्याला फुकट मत द्यायचे नाही असली भावना मतदारांत आहे. त्यामुळे निवडून यायचे, पुढचे राजकारण करायचे तदर पैसा मिळवणे हे उद्दिष्टच काहींनी राबवले आहे. अक्षरसः मुर्दाडपणे ते मिळवत आहेत. काल परवा कायनेटीकवरून फिरणारे आज सोन्याने लगडलेले आहेत. किंमती गाड्यांची त्यांच्या दारात रांग आहे. राजेश क्षीरसागर म्हणतात ते खरे आहे. "एवढ्या झटपट माणसे कशी श्रीमंत होतात' या त्यांच्या प्रश्‍नातच त्याचे उत्तर दडले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com