नारायण राणे - ना काँग्रेसमध्ये ‘गम’, ना भाजपात ‘खुशी’

नारायण राणे - ना काँग्रेसमध्ये ‘गम’, ना भाजपात ‘खुशी’

सध्या मिडीयामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू असलेल्या राणेंचा राजकीय 'टीआरपी' दिवसेंगणिक घसरत असल्यामुळे नारायण राणेंच्या चर्चेचे ना काँग्रेसमध्ये ‘गम’, ना भाजपामध्ये ‘खुशी’ असेच चित्र पहावयास मिळत आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तुरडाळीइतकीच नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. तुरडाळ प्रकरणी तरी किमान एका बाजूने विरोधक आरोप करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपा पक्ष मागील आठ वर्षातील आकडेवारी सादर करताना मागील आघाडी सरकारपेक्षा आपल्या सरकारची कामगिरी कशी दमदार व कसदार हे दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. नारायण राणेप्रकरणी तर उलटेच चित्र पहावयास मिळत आहे.

नारायण राणेंची काँग्रेसमधील नाराजी आणि त्यांचा भाजपामध्ये होणार असल्याचा प्रवेश ही चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. शिवसेनेमध्ये नेते, मुख्यमंत्रीपद उपभोगूनही संघटनेवर नाराजी व्यक्त करत आणि त्यानंतर ‘मातोश्री’वर कडवट टीकेची तोफ डागणार्‍या नारायण राणेंचे काँग्रेसमध्ये आजतागायत त्यांच्या मनासारखे पुनर्वसन झालेले नाही. मुख्यमंत्रीपदाची क्षमता व महत्वाकांक्षा असणार्‍या नारायण राणेंना काँग्र्रेसने सत्ता असतानाही मुख्यमंत्रीपदापासून जाणीवपूर्वक कोसो मैल लांबच ठेवले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, माजी खासदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी पराभवाचे खापर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर फोडत त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. काही दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षसंघटनेकरिता काँग्रेसच्या आमदारांनी एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाणांनी सादर करताच आमदार नितेश राणे यांनी त्यास नकार देत प्रस्तावाला कडाडून विरोध केला.

इतकी वर्षे सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसवर अशी वेळ का आली असा प्रतिप्रश्‍न आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला. नारायण राणे व नितेश राणे यांची अहमदाबाद वारी ‘व्हायरल’ झाल्याने राणे परिवाराच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच राणेंच्या दोन्ही पुत्रांकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर टीकेची तोफ डागली जात असल्याने राणे काँग्र्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नारायण राणे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगत असले तरी नारायण राणेंच्या काँग्रेसमध्ये असल्याचे खर्‍या काँग्रेसींना सुख नाही आणि भाजपातील मंडळीदेखील राणेंना भाजपामध्ये घेण्यास फारशी उत्सुक नाहीत असेच राजकीय क्षेत्रात चित्र निर्माण होवू लागले आहे.

नारायण राणेंसारख्या लढवय्या नेतृत्वाबाबत असे चित्र होणे राणे परिवारासाठीही शोभनीय नाही. नारायण राणेंचा आक्रमक पिंड हा मुळातच शिवसेनेच्या मुशीत तयार झालेला आहे. सर्वसामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्रीपदापर्यतचा चढता आलेख राणेंना शिवसेनेमुळे आणि शिवसैनिकांमुळेच शक्य झालेला आहे. शिवसैनिक, शाखाप्रमुख, मुंबई महापालिकेतील बेस्ट कमिटी, आमदार, मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री अशी पदाची व मानसन्मानाची शाल शिवसेनेतून नारायण राणेंना देवूनही राणे शिवसेनेत राहीले नाही.

शिवसेना सोडून गेल्यावरही त्यांनी  व त्यांच्या मुलांनी सातत्याने कडवट शब्दांमध्ये ‘मातोश्री’वर कडवट शब्दामध्ये सातत्याने टीका करण्यात धन्यता मानली. जाताना ते एकटे गेले नाही, तर काही आमदारांना सोबत घेवून शिवसेनेला थोडेफार खिंडार पाडूनच गेले.  काँग्रेसमध्ये त्यांच्यातील बंडखोर व आक्रमकपणा त्यांना शांत बसू देत नव्हता. आक्रमक स्वभावाला मुरड घालत काँग्रेस संस्कृतीशी समरस होणे राणेंना आजतागायत जमलेच नाही.

काँग्रेसच्या नेतेमंडळींना त्यांनी सातत्याने आवाहन देण्याचेच काम केले. काँग्रेस सत्तेवर होती, तोपर्यत काँग्रेसमध्ये राणेंचे उपद्रवमूल्य सहन करण्याचे काम काँग्रेसच्या अन्य नेतेमंडळींनी केले. पण मागील लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेमध्ये राणेंचे सुपुत्र निलेश राणे पराभूत झाले. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे निवडून आले असले तरी नारायण राणेंवर कोकणातीलच लाल मातीमध्ये पराभूत होण्याची नामुष्की आली. तेथूनच राणेंच्या काँग्रेसमधील उपद्रवमूल्याला खर्‍या अर्थांने ग्रहण झाले. राणे शिवसेनेचे होवू शकले नाही आणि काँग्रेसमध्ये कोणाशी जमवून घेवू शकले नाही, असा संदेशच त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात गेला.

भाजपामध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचे व राज्यात देवेंद्र फडणवीसांचे प्रस्थ वाढत गेले. त्यांच्या कारभारातून त्यांनी संघटनात्मक व प्रशासनात जम बसविला. केंद्रात मोदी प्रभावामुळे त्यांना शह देण्याचे धाडस कोणीही भाजपा नेता दाखवित नसला तरी राज्यात मात्र भाजपामध्ये अंर्तगतरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत शह-काटशहाचे राजकारण भाजपातील नेतेमंडळी करत असतात. मराठा मोर्चाला मिळालेले आर्थिक पाठबळ हे मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या एका भाजपा मंत्र्याच्या खिशातून मोठ्या प्रमाणावर मिळाले होते, ही बाबही आता लपून राहीलेली नाही.

त्यातच राणेंना पक्षात आणून एकप्रकारे मुख्यमंत्री फडणवीसांना शह देण्याच्या हालचाली काही भाजपा मंत्र्यांकडून आणि भाजपा पक्ष संघटनेतील मातब्बर पदाधिकार्‍यांकडून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भाजपा पक्षसंघटनेत व सत्तेमध्ये ‘सिंहासना’चा खेळ सुरू झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा राणेंचा भाजपा प्रवेशाला प्रखर विरोध असल्यामुळे राणेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडत चालला आहे.

प्रशासनावर मुख्यमंत्र्यांची मजबूत पकड असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणूका, मुंबई महापालिका यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केल्यामुळे फडणवीसांना दुखविण्याचे धाडस सध्या कोणीही दाखविणार नाही. त्यात मुख्यमंत्री संघ परिवारातील सदस्य असल्याने मुख्यमंत्री विरोधकांना भाजपातून फारसे पाठबळ मिळण्याची शक्यता नाही.
सध्या शिवसेना-भाजपामध्ये संघर्षाचा कलगीतुरा असून राणेंना भाजपात प्रवेश देवून शिवसेनेला दुखविण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस नसावा.

भाजपाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रूजत चालली असून कोकणातही भाजपाने शिरकाव केलेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जेमतेम एक आमदार असलेल्या राणे परिवाराला भाजपात घेवून भाजपाची फारशी ताकद वाढणार नसल्याचे मुख्यमंत्री समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. राणेंच्या प्रवेशामुळे शिवसेना नाराज होणार, राणेंमुळे नव्या गटबाजीला नेतृत्व मिळणार, राणेंसह  त्यांच्या दोन्ही मुलांचे राजकीय पुनर्वसन करावे लागणार या कटकटीपेक्षा राणेंना पक्षात न घेतलेलेच बरे असे मुख्यमंत्री समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षामध्ये राणे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेची फारशी दखल घेतली जात नाही. राणे पक्ष सोडून गेल्यास फार तर सध्या विधानसभेतील एक संख्याबळ कमी होईल. पण काँग्रेस पक्षातील गटबाजी व वरिष्ठांवर होत असलेली चिखलफेक संपुष्ठात येईल अशी चर्चा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये आणि आमदारांमध्ये सुरू आहे. त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राचा राजकीय आखाडा गाजविणार्‍या नारायण राणेंबाबत ना भाजपात ‘खुशी’, ना काँग्रेसमध्ये ‘गम’ असे चित्र निर्माण होवू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com