सत्तारूढ भाजपमध्ये गटबाजीचे मळभ 

सत्तारूढ भाजपमध्ये गटबाजीचे मळभ 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धूळ चारत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद सत्ता संपादन केली. भाजपचे पहिले महापौर विराजमान होऊन जवळपास दोन महिने होत आले. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन ताकद पणाला लावली. त्याचे फळ सत्तेच्या रूपाने मिळाले; पण आता हीच सत्ता नेत्यांमध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपमधील ही गटबाजी चव्हाट्यावर आली. त्याची वेळीच दखल घेण्याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांची आणि अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे...

राष्ट्रवादी कॉंग्रेसची गेल्या पंधरा वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून भाजपने महापालिकेवर आपला झेंडा रोवला. त्यात पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या यशाला राष्ट्रवादीतून पक्षात दाखल झालेले आझम पानसरे आणि राज्यसभा सदस्य अमर साबळे यांचाही हातभार लागला. मात्र, एवढ्यावरच हे यश अवलंबून नव्हते; तर त्यासाठी मूळ भाजपवासी गडकरी, मुंडे गटाचेही तेवढेच श्रेय आहे हे नाकारून चालणार नाही. सत्तांतराला काही अंशी राष्ट्रवादी कॉंग्रेसही कारणीभूत होती. पंधरा वर्षांत त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची परिणती पराभवात झाली. म्हणजे निगेटिव्ह वोटिंगचाही वाटा त्यात होता. 

जगताप यांना धक्का 
सत्तांतरानंतर भाजपमध्ये श्रेयासाठी नाटकाचा पहिला अंक सुरू झाला. महापौर कोणाचा यासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली. त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बाजी मारली. त्यांच्या गटाचे नितीन काळजे महापौर झाले. महापौरपदापासून सत्तारूढ पक्षनेता, विषय समित्यांपर्यंत लांडगे गटाचे वर्चस्व राहिले. अपवाद स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राहिला. त्या पदावर शहराध्यक्ष जगताप गटाचे वर्चस्व राहिले. शहराध्यक्षांना स्वीकृत सदस्यांची निवड मनाप्रमाणे करता येईल, असे वाटत असतानाच त्याला खासदार अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांनी सुरुंग लावले. पक्षाच्या कोअर कमिटीने शहराध्यक्षांना स्वीकृत सदस्यांची संभाव्य पाच नावे मुख्यमंत्र्यांना कळविण्याचे अधिकार दिलेले असताना साबळे व पटवर्धन यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे माऊली थोरात व बाबू नायर यांची नावे सुचविली. मोरेश्‍वर शेडगे यांच्यासह त्याच तीन नावांना मुख्यमंत्र्यांनी संमती देऊन अंतिम ठरविली. त्यामुळे शहराध्यक्ष जगताप यांना मोठा धक्का बसला. 

सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असताना "स्वीकृत' निवडीवेळी बाजूला राहण्याची वेळ शहराध्यक्ष जगताप व आमदार महेश लांडगे यांच्यावर आली. निवडणुकीवेळी पक्षातील काही निष्ठावंतांची तिकिटे कापण्यात आली. त्याचा रोष शहराध्यक्ष जगताप यांनी ओढवून घेतला. त्यामुळे जुने निष्ठावंत विरुद्ध जगताप असे चित्र निवडणुकीवेळी होते. ते बदलून जुने काही कार्यकर्ते जगताप यांच्या गोटात सामील झाले. सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, नामदेव ढाके हे गडकरी गटाचे तसेच महेश कुलकर्णी, प्रमोद निसळ,राजू दुर्गे हे जगताप यांच्या गोटात सामील झाले तर माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे हे आपल्या समर्थकांसह खासदार अमर साबळे व सचिन पटवर्धन यांच्या गटात सामील झाले. आमदार महेश लांडगे यांचा तिसरा गट तयार झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा गट तटस्थ आहे. 

खरेतर पक्षात नव्याने दाखल झालेल्यांना भाजप अद्याप कळला नाही असेच म्हणावे लागेल. भाजपमध्ये व्यक्तिस्तोमाला महत्त्व नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात स्वीकृत सदस्यांची नावे जेव्हा जाहीर केली, तेव्हा त्याचा साक्षात्कार पिंपरी-चिंचवड भाजपलाही झाला. यश मिळाल्याने हवेत गेलेल्या नेतेमंडळींना मुख्यमंत्र्यांनीच खाली आणण्याचे कामही करून टाकले. 

तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार 
एवढे सगळे होऊनही कोणी काहीच कसे बोलले नाही, याचे उत्तरही त्यातच आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत आहेत. सत्तेत राहून शिवसेनेने ताणून धरले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधकांनी जेरीस आणले आहे, अशा परिस्थितीत सरकार चालवायचे, की मुदतपूर्व निवडणुका घ्यायच्या या विचारात भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार करायचा झाला, तर त्यात शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यापैकी एकाची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते. त्यामुळेच स्वीकृतवरून एवढे रामायण होऊनही हे दोन्ही नेते तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करीत आहेत. नाहीतर भांडणे विकोपाला गेली असती. पक्षातील लोकांनी आता आपण सत्तेत आहोत याची जाणीव ठेवून जबाबदारीने वागायला हवे. तसेच पाच वर्षे सत्ता टिकविण्यासाठी सर्व गटांना एकत्रित ठेवण्याची कसब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदारी उचलावी लागेल, नाहीतर आली सत्ता उधळणार कशी याकडे राष्ट्रवादीचे लोक नजर ठेवूनच आहेत, याचे भान भाजपने ठेवायला पाहिजे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com