द्रविडी अस्मितेचं लाल "कमल' फुलणार का ?

द्रविडी अस्मितेचं लाल "कमल' फुलणार का ?

मद्रास उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे तमिळनाडूतील राजकीय अस्थिरता आणखी वाढली आहे, पलानीस्वामी, पनीरसेल्वम, आणि दिनकरन या सत्तातुरांच्या कुरघोडीमध्ये "अण्णाद्रमुक'तीन गटांत विभागल्या गेला. करूणापूत्र स्टॅलिन आणि राज्यपाल विद्यासागरराव यांचे राजकीय मनसुबे लपून राहिलेले नाहीत. अम्मापर्वाच्या अस्तानंतर तमिळी राजकारणाला ग्लानी आली आहे. अशा परिस्थितीत सिनेस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांच्याकडून केल्या जाणाऱ्या पर्यायी राजकीय मांडणीकडे तमिळी जनता आशाळभूत नजरेने पाहत आहे. यात कमल हसन यांची "डावी' बाजू अधिक उजळून दिसते.

""साक्षात देव समोर आला तरीसुद्धा मी त्याची पुजा करणार नाही'' असा अस्सल पेरियारी द्रविडी बाणा जपणारे, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतल्यानंतर आपल्या संभाव्य राजकीय प्रवेशाबाबत ""माझा रंग भगवा नक्कीच नाही'' असे निक्षुन सांगणारे दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन म्हणजे द्रविडी संस्कृतीचा प्रखर बुद्धिवादी तारा होय. रूढार्थाने जाती व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय समजल्या कुटुंबात कमल हसन यांचा जन्म झाला. आपल्या 62 वर्षांच्या रूपेरी कारकीर्दीत त्यांनी प्रस्थापित मुल्यांना वेळोवेळी धक्के दिले. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक, पार्श्‍वगायक, नृत्यदिग्दर्शक, गीतकार, नर्तक आणि मानवाधिकाराचे पुरस्कर्ते हा कमल हसन यांचा प्रवास केवळ स्तिमित करणारा आहे. यामुळेच की काय जेव्हा जेव्हा दक्षिणेचा महानायक रजनीकांतच्या व्यावसायिक स्पर्धकांची चर्चा सुरू होते. तेव्हा कमल हसन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 

सध्या टॉलीवूडवर अधिराज्य गाजविणारा रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) तन मन आणि धनाने दक्षिण भारतीय असला तरीसुद्धा तो कमल हसन इतका प्रखर दाक्षिणात्य नाही. त्यामुळेच या रोबोमॅनने प्रथम राजकीय चाचपणी करताना आधी तमीळ अस्मितेला स्पर्श केला. कमल हसनची 62 वर्षांची चित्रगाथा स्वतंत्र ग्रांथिक प्रपंच ठरावा एवढी मोठी आहे. तुर्तास आपण या नायकातील राजकीय नेत्याचा शोध घेऊ या. 

दक्षिणेतील राजकीय नाट्याचा रूपेरी पडदा हा खूप विस्तीर्ण आहे. एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव, शिवाजी गणेशन, जयललिता, चिरंजिवी, पवन कल्याण, सुरेश गोपी, आर.सारथकुमार व्हाया हा प्रवास रजनीकांत आणि कमल हसन यांच्यापर्यंत येतो. "अण्णाद्रमुक'च्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर तमिळी राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. आता तर सत्ताधारी "अण्णाद्रमुक' हा मुख्यमंत्री पलानीस्वामी, ओ.पनीरसेल्वम आणि शशिकला(दिनकरन) अशा तीन गटांमध्ये विभागल्या गेला आहे. यात राज्यपाल विद्यासागरराव यांच्या माध्यमातून भाजपची लुडबूड सुरूच आहे. राजकीय आघाडीवर गटबाजीचे राजकारण शिगेला पोचले असताना रजनीकांत आणि कमल हसन यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाबाबत बरीच चर्चा झाली. रजनीकांत यांची लोकप्रियता लक्षात घेता त्यांची एवढी चर्चा होणे स्वाभाविक होते पण कमल हसन यांच्याकडे माध्यमांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की काय अशी शंका घ्यायला बराच वाव आहे. रजनीकांत यांनी योग्य वेळीआपण राजकीय प्रवेशाची घोषणा करू असे सांगत आपल्या चाहत्यांना युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले तर कमल हसन यांच्या राजकीय भेटीघाटी बरंच काही सांगू पाहत आहेत. 

काळ बदलला तरीसुद्धा राजकारणाचे संदर्भ नेहमीच बदलत नसतात. कधीकाळी याच तमिळनाडूने एम.जी.रामचंद्रन आणि शिवाजी गणेशन अशी सुप्त राजकीय स्पर्धा अनुभवली आता त्याच राज्यामध्ये भविष्यात नवे "स्टार वॉर' भडकले तर आश्‍चर्य वाटायला नको. रजनीकांत आणि कमल हसन या दोघांची लोकप्रियता भल्याभल्या राजकीय नेत्यांच्या उरामध्ये धडकी भरवणारी आहे. रजनीकांत यांच्याकडे भविष्यातील एम.जी.रामचंद्रन म्हणून पाहिले जाते तर कमल हसन यांना गणेशन यांची प्रतिछाया ठरविले जात आहे. ज्यावर तमिळी राजकारणाची पायाभरणी झाली ती द्रविडी चळवळ पेरियार ई.व्ही.रामास्वामी यांनी 1925 साली सुरू केली होती. प्रस्थापित ब्राह्मणी नेतृत्वाला आव्हान देत मागासलेल्या जातींना व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणणे हा त्याचा उदेश होता. राजकारण नेहमीच चळवळीच्या मार्गाने चालत नसते. द्रविडी चळवळीची विद्यमान गती आणि मती पाहिली तर याची प्रचिती येते. कधीकाळी "द्रमुक'मधून बाहेर पडलेल्या रामचंद्रन यांनी केवळ स्वकरिष्म्याच्या जोरावर "अण्णाद्रमुक' स्थापन केली आणि तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपदही भुषविले. कामराज निष्ठेमुळे गणेशन कॉंग्रेसच्या वळचणीला गेले आणि संपले, ना त्यांना "द्रमुक'कडून न्याय मिळाला ना व्ही. पी. सिंह यांच्या जनता दलाने त्यांना मोठे केले. सत्तेच्या सिंहासनावर कुणीतरी एकजण विराजमान होऊ शकतो हे राजकारणाचे विधिलिखीत तमिळनाडूतही खरे ठरले. 

आता कमल हसन ज्या बुद्धिप्रामाण्यवादी मार्गाने राजकारण करू पाहत आहेत तो त्यांना सत्तेच्या सर्वोच्चस्थानी नेईलच याची शाश्‍वती देणारा नाही. कारण राजकारण म्हटलं की अनुयायांना, समर्थकांना झुलवावे लागते ही कला जयललिता यांना चांगलीच अवगत होती. "द्रमुक'च्या करूणानिधींनीही मोफतबारीतून जनतेला नादाला लावलं. यामुळे राज्याचं काहीच भलं झालं नाही वाढली फक्त "पोएस गार्डन' आणि "गोपालपुरम'ची श्रीमंती. केंद्रामध्ये कॉंग्रेसची राजवट असताना करूणानिधींच्या राजा कंपनीने अख्खं सरकार बदनाम केलं होतं. याची मोठी किंमत कॉंग्रेसला आणि डॉ. मनमोहनसिंग यांना बदनामीच्या रूपाने मोजावी लागली. 
.............. 
दिलदारपणाची हातमिळवणी 
राष्ट्रीय पातळीवर "द्रमुक' मृतवत असला तरीसुद्धा तामिळनाडूत त्याचे अस्तित्व कायम आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललितांनी आपले एकखांबी नेतृत्व तयार करण्याच्या नादात अन्य कोणत्याही नेत्यास मोठे केले नाही, आता त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहे. "अण्णाद्रमुक'च्या चिरफाळ्या झाल्यानंतर "द्रमुक'ने करूणापूत्र स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्टॅलिन यांना जनता कितपत स्विकारेल याबाबत संभ्रम आहेच, राज्यातील हीच पोकळी लक्षात घेऊन रजनीकांत आणि कमल हसन यांनी चाचपणी करून पाहिली. रजनीअण्णा राजकीय प्रवेशाबाबत अनुकूल असल्याचे दिसताच कमल यांनीही व्यावसायिक स्पर्धा बाजूला ठेवून त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले. हा कमल हसन यांचा दिलदारपणाच म्हणावा लागेल. राजकीय पातळीवर असे फारसे कधी घडत नसते. रजनीकांत यांच्यासाठी भाजपने भगवे कार्पेट अंथरलं आहे कमल हसन यांच्याबाबत ही परिस्थिती नाही. भाजप व्यतिरिक्त अन्य कुणा पक्षाने रजनीअण्णांसारखीच ऑफर कमल यांना देऊ केली तर ती ते धुडकावून लावतील यात शंकाच नाही. कमल हसन यांच्या चित्र इतिहासात डोकावून पाहिले तर त्यांची ही बंडखोरी नवी नसल्याचे दिसते. थेवर मागन (1999), हे राम (2000), विरूमंडी (2004) आणि विश्‍वरूपम (2013) सारख्या सिनेमांतून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. चित्रअभिव्यक्ती जपताना कमल यांनी कधीही मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळे तमिळनाडूतील थेवर आणि मुस्लिम समुदाय दुखावल्या गेला होता. "विश्‍वरूपम'च्या प्रदर्शनावेळी तर जयललितांनी या चित्रपटावरच बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर कमल यांनी थेट देश सोडून जाण्याचा पवित्रा घेतला होता. इतका स्पष्ट आणि रोखठोक माणूस राजकारणात टिकेल काय? अशी शंका कुणाच्याही मनात येईल. पण असा माणूस व्यवस्थेमध्ये असावा लागतो. सगळेच जण व्यवस्थाशरण होऊ लागले तर आहे त्या व्यवस्थेलाच ग्लानी येण्याची भीती असते. तमिळनाडूतील आजची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. सध्या देशभर एका कमळाविरोधात असंतोष खदखदत असताना तमिळनाडूच्या समुद्रामध्ये उमलू पाहणाऱ्या बुद्धिवादी "कमला'स तेथील जनतेने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 
...... 
राजकीय कुरघोडीला ऊत 
सध्या तमिळनाडूत निर्माण झालेली राजकीय स्थिती भल्याभल्या विश्‍लेषकांना बुचकळ्यात पाडणारी आहे. दिनकरन गटाच्या अठरा बंडखोर आमदारांनी पलानीस्वामी यांचे सरकार अस्थिर केले आहे. पलानीस्वामी, पनीसेल्वम, दिनकरन अशा तीन गटांमध्ये विभागल्या गेलेला "अण्णाद्रमुक', राज्यपाल विद्यासागरराव आणि "द्रमुक'चे कार्याध्यक्ष स्टॅलिन आदी मंडळींनी आपआपला पक्ष मांडत मद्रास उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. यावर बुधवारी निकाल देण्याआधी न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेतली. न्यायालयाने विश्‍वासदर्शक ठरावास स्थगिती देतानाच "अण्णाद्रमुक'मधून बडतर्फ करण्यात आलेल्या 18 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेऊ नका असे आदेश दिले. न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे बंडखोरांचे बळ वाढले आहे. दिनकरन यांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. मद्रास उच्च न्यायालयात याबाबत झालेली सुनावणी हायप्रोफाईल ठरली, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, आर्यमान सुंदरम आणि दुष्यंत दवे आदी दिग्गज मंडळी काळे कोट घालून न्यायालयात आली होती. अर्थात हे सर्वकाही राज्यातील जनतेच्या भल्यासाठी चाललेले नाही, ज्याला त्याला आपला स्वार्थ प्यारा आहे. प्रत्येकजण सत्तेसाठी स्वत:चा उर बडवून घेत असताना रजनीकांत आणि कमल हसन यांच्याकडून केली जाणारी राजकीय घट मांडणी सर्वांत उजवी आहे असे म्हणावे लागेल. अर्थात तिचे यशही जनतेच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com