एका "विश्‍वासा'चं पानिपत 

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी "आप'नेही अन्य पक्षांप्रमाणेच सौदेबाजी केली काय, असे अनेक प्रश्‍न राजकीय विश्‍लेषकांप्रमाणेच "आप'चे नेते आणि कार्यकर्त्यांनाही पडले आहेत. कवितेतील मुक्तछंद राजकारणात चालत नसतो, हे कुमार विश्‍वास यांच्या वेळीच लक्षात आले असते, तर आजची ही स्थिती ओढावली नसती.
एका "विश्‍वासा'चं पानिपत 

सियासत से अदब की दोस्ती बेमेल लगती है 
कभी देखा है पत्थर पे भी कोई बेल लगती है 

आघाडीचे शायर मुनाव्वर राणा यांच्या या काव्यपंक्ती त्यांचेच कवी मित्र कुमार विश्‍वास यांची व्यथा मांडणाऱ्या आहेत. आम आदमीचा कैवार घेत राजधानी दिल्लीचे शासनकर्ते झालेल्या अरविंद केजरीवालांची पावले प्रस्थापित राजकीय मार्गावर पडूनही आता बराच काळ लोटला आहे.

केवळ "मोदीविरोध' या एकाच गोष्टीचा आधार घेत आम आदमी पक्षाने समविचारी पक्षांशी हातमिळवणी केली खरी, पण त्याचा राजकीय फायदा मात्र त्यांना उठविता आला नाही. परिणामी, पंजाबमधील दारुण अपयशानंतर केजरीवालांचा आम आदमी "दिल्ली लिमिटेड' झाला. 

एकीकडे दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशन आणि "तोंडी तलाक' विधेयकासारखे मुद्दे गाजत असताना "आप' पुन्हा चर्चेत आला तो राज्यसभा निवडणुकीमुळे. या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची उमेदवारी स्वीकारावी म्हणून केजरीवालांनी विविध क्षेत्रांतील नऊ- दहा मान्यवरांशी संपर्क साधला होता. यात "आरबीआय'चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचाही समावेश होता. पण या सर्वांनीच नकार दिल्यानंतर केजरीवालांना अन्य नावांचा शोध घ्यावा लागला, अशी "आप'मधील नेत्यांची आम "राय' आहे.

पक्षाच्या कार्यकारिणीतही यावर बरीच खलबते झाल्यानंतर निष्ठावान संजयसिंह, उद्योजक सुशील गुप्ता आणि आघाडीचे लेखापाल नारायणदास गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली. पण या सगळ्या गोंधळात पानिपत झाले ते कवी मनाचे कुमार विश्‍वास यांचे. 

"गुप्ता अँड कंपनी'ला उमेदवारी देताना केजरीवालांसारख्या बेरकी राजकारण्याने त्यांच्या अर्थबळाचा विचार केलाच नसेल असे म्हणणे शुद्ध वेडेपणा ठरेल. सध्या राजधानीत याचीच चर्चा रंगली आहे. हे सगळे डोळ्यांदेखत घडत असताना विश्‍वास यांच्यातील कवीचे राजकीय हृदय विदीर्ण झाले.

"मारेंगे लेकीन शहीद भी नहीं होने देंगे' या केजरीवाल काव्याने आपला "गेम' केल्याचे दु:ख त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखविले. दिल्ली विधानसभेची सदस्यसंख्या सत्तर, त्यात "आप'च्या 66 आमदारांचा समावेश असल्याने या पक्षाच्या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्‍चित मानला जातो. यातील एक जागा तरी आपल्या वाट्याला येईल, अशी आशा कुमार विश्‍वास यांना होती. पण केजरीवालांनी संजयसिंहांना पुढे करून विश्‍वास यांचा पत्ता कट केला. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून केजरीवालांसोबत असलेल्या कुमार विश्‍वास यांच्या वाट्याला हा राजकीय विजनवास का आला ? हताश झालेले कुमार विश्‍वास अन्य नेत्यांप्रमाणेच भाजपवासी होणार काय ? राज्यसभेच्या उमेदवारीसाठी "आप'नेही अन्य पक्षांप्रमाणेच सौदेबाजी केली काय, असे अनेक प्रश्‍न राजकीय विश्‍लेषकांप्रमाणेच "आप'चे नेते आणि कार्यकर्त्यांनाही पडले आहेत. कवितेतील मुक्तछंद राजकारणात चालत नसतो, हे कुमार विश्‍वास यांच्या वेळीच लक्षात आले असते, तर आजची ही स्थिती ओढावली नसती. 

काश्‍मीरमधील लष्कराची भूमिका, "सर्जिकल स्ट्राइक', तिकीटवाटपातील कथित गैरप्रकार आणि पंजाबमध्ये कट्टरपंथीयांबाबत केजरीवालांनी घेतलेल्या भूमिकेला वेळोवेळी कुमार विश्‍वास यांनी छेद दिला. याची मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली.

तसे पाहता 2014 मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव होणार हे निश्‍चित असतानाही विश्‍वास हे केजरीवालांच्या सांगण्यावरून तेथे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पराभव झाला तरी भविष्यात पुनर्वसन होईल अशी भाबडी आशा ते बाळगून होते, पण केजरीवालांसारखा मुरलेला आत्मकेंद्री नेता शेवटी सत्तेच्या सारीपाटावर प्रस्थापित डावच खेळत असतो हे मात्र त्यांना ओळखता आले नाही. 

""माहिष्मती की शिवगामी देवी कोई और है, जो बाहुबली को मारने के लिए हर बार कटप्पा बदलती है'' हे विश्‍वास यांचे "ट्विट'बोल केजरीवालांबाबत बरेच काही सांगून जातात. तसेच त्यातून प्रस्थापित नेतृत्वाला शरण गेलात, तरच तुमचा राजमार्ग प्रशस्त होतो हे कटू वास्तव ठळकपणे अधोरेखित होते.

संसदेचे वरिष्ठ सभागृह असणारी राज्यसभा कधीकाळी विद्वानांचे गृह म्हणून ओळखले जात असे. मागील दोन-तीन वर्षांपासून सत्ताधाऱ्यांचा उद्घटपणा आणि विरोधकांचे "हम करे सो कायदा' या वृत्तीमुळे कामकाजाचे बारा वाजत आहेत. सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत विरोधकांना फाट्यावर मारायचे आणि विरोधकांनी राज्यसभेत सरकारची कोंडी करायची हे ठरलेले राजकीय समीकरण. राष्ट्रपती नियुक्त बारा सदस्य देखील पक्षीय वशिल्यानेच नेमले जात असल्याने त्यांच्याविषयी न बोललेच बरे. निदान "आप'मुळे तरी यामध्ये वेगळा पायंडा पडेल अशी आशा होती पण ती केजरीवालांमुळे फोल ठरली.

कदाचित केजरीवालांचा एककल्ली हेकेखोर स्वभाव ठावूक असल्याने "त्या' मान्यवरांनी "आप'ची ऑफर नाकारली असावी अशी चर्चा "आप'च्याच वर्तुळामध्ये आहे. ही बाब खचितच केजरीवालांच्या राजकीय चारित्र्याला शोभणारी नाही. 

पैसा हवाच 
पक्ष अथवा संघटना केवळ विचारधारेवर चालत नाही. दिल्लीसारख्या राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील शहरामध्ये संघटना टिकवून वाढवायची असेल तर पैसा हवाच. देणग्यांचा ओघ घटला की राजकीय पक्षांनाही मग वेगळे मार्ग निवडावे लागतात. "आप'ने राज्यसभेची उमेदवारी पन्नास कोटी रूपयांना विकल्याचा आरोप केला जात आहे. अर्थात यातील सत्य किती आणि अतिरंजितपणा किती हा वेगळा विषय असला तरीसुद्धा गुप्तांची आर्थिक "गंगा' "आप'च्या तिजोरित जाणार हे वेगळे सांगायला नको. या देवाणघेवाणीच्या राजकारणात कुमार विश्‍वास यांच्या कविता आणि मुशायऱ्यांपेक्षा केजरीवालांना "मनी'भाईचेच महत्व अधिक वाटले तर त्यात नवल ते कसले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com