अमित शहांच्या 'मातोश्री'वारीने उद्धव ठाकरेंचा राग शांत होईल का?

गेल्या चारवर्षे पदोपदी झालेल्या अपमानाचे शल्य उद्धव ठाकरेंच्या मनातून जाईल काय? गावागावात गळ्यात भगवा पंचा घालून वाघाचे चित्र मोटरसायकलवर अभिमानाने मिरविणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचे समाधान केवळ एका भेटीने आणि कॅमेऱ्यासमोरच्या खोट्या-खोट्या हासण्याने खरोखर होईल काय?
Amit Shah - Udhhav Thakre
Amit Shah - Udhhav Thakre

पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा बुधवारी मातोश्रीवर दाखल होऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. अमित शहांच्या भेटीने उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा राग शांत होईल का? हा खरा प्रश्‍न आहे.

भारतीय जनता पक्षाच्या 2014 च्या निवडणूक दिग्विजयाचे शिल्पकार म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांकडे पाहिले जाते. पण या दोघांनी शिवसेनेला लोकसभा निवडणुका पार पाडल्यापासून ते आतापर्यंत जी वागणूक दिली त्यामुळे शिवसेनेच्या गोटात तीव्र असंतोष आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षशिस्तीत राहून हायकमांडने आखून दिलेल्या चौकटीत शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या . राज्यातील सत्तेत शिवसेनेच्या सहभागाबाबत फडणवीसांचा आग्रह महत्वाचा ठरला होता .

उद्धव  ठाकरे यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध जपत फडणवीसांनी मुंबई महापालिकेतील सत्तेसह अनेक विषयात शिवसेनेला कधी अप्रत्यक्ष तर कधी थेट सहकार्याची भूमिका घेतली . पण या दोघातील संबंध शिवसेनेचा राग शांत करण्यास पुरेसे ठरतील का ? 

केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एक कॅबिनेट मंत्रिपदावर सर्वांत मोठ्या मित्रपक्षाची अर्थात शिवसेनेची बोळवण करणाऱ्या मोदींनी त्यांना खाते दिले तेही नावाला अवजड असलेले पण व्यवहारात हलके ठरणारे अवजड उद्योग मंत्रालय.

लोकसभेला भाजपची शिवसेनेशी असलेली युती विधानसभेला मोडली. युती कोणामुळे तुटली हा वादाचा विषय आहे, पण भाजपला लोकसभेतील यशामुळे शिवसेनेची गरज तेव्हा वाटत नव्हती हे खरे. तशी गरज असती तर भाजपने नेहमीप्रमाणे पडते घेऊन युती केलीच असती.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपला सरकार स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देऊ केल्यावर शिवसेनेबरोबरची पंचवीस वर्षाची मैत्री विसरून भाजपने आपल्या मंत्र्यांचा शपथविधी उरकून घेतला आणि विश्‍वासदर्शक ठराव देखील.

शिवसेनेचा बराच तेजोभंग करून भाजपने शिवसेनेला राज्य मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले खरे पण खाती वाटपात पार पानिपत करून टाकले. शिवसेनेला अपेक्षित असलेली मंत्रिपदे मिळाली नाहीत आणि अपेक्षित खातीही मिळाली नाहीत.

महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या पक्षांचे अस्तित्वच उरलेले नाही असे मानून भाजपतर्फे शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. महानगरपालिका , नगरपालिका आणि ज़िल्हा परिषदात भाजचा विजयरथ सुसाट सुटल्यानंतर शतप्रतिशत भाजपच्या घोषणा गावोगावी घुमायला लागल्या होत्या. शिवसेना तोंड दाबून हा बुक्‍क्‍यांचा मार सहन करीत होती.

आधी नोट बंदी आणि नंतर जीएसटीची अंमलबजावणी यामुळे जनमत फिरण्यास सुरवात झाली. गुजरातमध्ये भाजप काठावर पास झाल्यानंतर कर्नाटकात  चांगले मार्क्सदेखील भाजपला सत्तेच्या परीक्षेत पास करू शकले  नाहीत. भाजपचा पराभव अवघड असला तरी आता अशक्‍य नाही याची जाणीव भारतातील तमाम राजकीय पक्षांना झाली.

सोशल मीडियावर पप्पूचा भाव वधारला . घड्याळ वेगाने चालू लागले . वाघाची डरकाळी घुमू लागली . पण कमलदल एकटे पडू लागले . त्यामुळे शिवसेनेचे राजीनामे हसण्यावारी नेणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पालघरच्या कडवट विजयाने पळाले . 

उद्धव ठाकरे आणि शिवसेना जणू या दिवसाचीच वाट पाहत होती. गेली चारवर्षे भाजपबरोबरचा सत्तेतील सहभाग धरले तर चावते आणि सोडले तर पळते, या म्हणीनुसार चालला होता. सरकारमधून बाहेर पडावे तर शिवसेनेचे आमदार फुटून भाजपच्या वळचणीला जाण्याची भीती एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या समोर होती तर दुसऱ्या बाजूला संघटनेतील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारासमोर आपली इभ्रत राखण्याची चिंता होती. त्यामुळे शिवसेनेने गेल्या दोन-अडीच वर्षात सरकारमध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा प्रयोग करून पाहिला. शिवसेनेच्या मंत्र्यांचे तयार असलेले राजीनामे हा राजकीय विनोदाचा आणि चेष्टेचा विषय बनला.

आता दिवस फिरले. एक-एक मित्रपक्ष भाजपला सोडून जात असताना आणि येत्या निवडणुकीत एक-एक खासदार महत्त्वाचा ठरणार असल्याने शिवसेनेचे बार्गेनिंग पॉवर खूपच वाढलेले आहे. त्यामुळे केवळ शब्दांचा फुलोरा आणि भविष्याची आश्‍वासने यावर शिवसेनेचे समाधान होणार आहे का?

गेल्या चारवर्षे पदोपदी झालेल्या अपमानाचे शल्य उद्धव ठाकरेंच्या मनातून जाईल काय? गावागावात गळ्यात भगवा पंचा घालून वाघाचे चित्र मोटरसायकलवर अभिमानाने मिरविणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचे समाधान केवळ एका भेटीने आणि कॅमेऱ्यासमोरच्या खोट्या-खोट्या हासण्याने खरोखर होईल काय?

शिवसेनेला सत्तेत सध्या आहे त्यापेक्षा मोठा वाटा देण्याची भाजपची तयारी राहील का ? महत्वाची खाती आणि अधिक मंत्री पदे शिवसेनेला भाजप देऊ करेल का याकडे निरीक्षकांचे लक्ष लागलेले असेल . शिवाय निवडणुका वर्षभरावर आलेल्या असताना शिवसेना वाढीव सत्तेचे गाजर पाहून तरी भूलेल का हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे .

किरीट सोमैय्या  , आशिष शेलार आदी भाजपच्या नेतेमंडळींनी उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पातळीवर जाऊन टीका केली होती त्याची परतफेड केल्याशिवाय सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्ता आता गप्प बसेल का ? या आणि अशा अनेक प्रश्नांचा गृहपाठ करून अमित शाह यांना मातोश्रीची पायरी चढावी लागणार आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com